फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अडीच वर्षांनी अटक
65 लाखांच्या अपहार केलेल्या एसीचा मार्केटमध्ये विक्री केली
अरुण सावरटकर
4 मे 2025
मुंबई, – दहिसर परिसरातील हिना डिस्ट्रिब्युटर या शॉपसह गोदामातून सुमारे 65 लाखांच्या एसीचा अपहार करुन मार्केटमध्ये विक्री करुन व्यावसायिकाची फसवणुक करणार्या कटातील एका आरोपीस अडीच वर्षांनी दहिसर पोलिसांनी अटक केली. विनिकर गौतम ऊर्फ सोनू धर्मेंद्र गौतम असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. गुन्हा दाखल होताच तो त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेला होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मंजुला मंजूनाथ पुजारी आणि मंजूनाथ पुजारी हे पती-पत्नी सहआरोपी असून मंजुळा ही या कटातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने विनिकर आणि मंजूनाथच्या मदतीने हा संपूर्ण आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
चिराग चंद्रकांत मेहता हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दहिसर परिसरात राहतात. त्यांचा हिना इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रिब्युटर नावाने स्वतचा इलेक्ट्रॉनिक वस्तूचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. दहिसर येथे त्यांचा एक शॉपसह गोदाम आहे. याच शॉपमध्ये मंजुळा ही मॅनेजर तर विनाकर हा कर्मचारी म्हणून कामाला होता. विनिकरसह इतर पाच कर्मचारी असून त्यांच्यावर डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होते. मंजुळा ही शॉपमध्ये येणारा माल गोदामात ठेवणे, त्याची ऑर्डरनुसार डिलीव्हरी करणे, बँकेसंबंधी काम बघणे तसेच मालाची अकाऊंटींग काम करत होती. सुरुवातीला या दोघांनी चांगल्या प्रकारे काम करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. व्यवसाय वाढीसाठी चिराग शहा हे नेहमीच मार्केटिंग आणि सेल्स कामानिमित्त बाहेर राहत असून त्यांनी शॉपसह गोदामाची सर्व जबाबदारी या दोघांवर होती.
ऑक्टोंबर 2019 रोजी त्यांनी गोदामातील सर्व इलेक्ट्रॉनिक सामानाची तपासणी केली होती, त्यात त्यांना काही एसींचा हिशोब मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी जिमेश विनोद केनिया यांना संपूर्ण स्टॉकची तपासणी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितले होते. गोदमातील मिसिंग एसीबाबत मंजुळाकडे विचारण करुन संपूर्ण हिशोब देण्यास सांगितले असता तिने काही एसीचे बिल बनविणे बाकी असल्याचे सांगितले. जानेवारी 2020 पर्यंत तिने हिशोब दिला नाही. याच दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले होते. त्यामुळे ती मार्च-जून 2020 दरम्यान कामावर आली नव्हती. 12 जुलै 2021 रोजी शॉपच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये मंजुळा आणि विनिकर हे दोघेही काही एसी घेऊन रिक्षातून घेऊन जात असल्याचे मिरा यादव या महिलेच्या निदर्शनास आले होते.
हा प्रकार मिराकडून समजताच चिराग मेहता यांनी या दोघांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी त्यांना मंजुळाने काही एसी तिच्या घरी ठेवल्याचे समजले होते. चौकशीदरम्यान मंजुळाने विनिकरच्या मदतीने शॉपसह गोदामातील सुमारे 51 लाखांचे 183 एसीची परस्पर विक्री करु पैशांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे शॉपसह गोदामातील स्टॉकची पुन्हा तपासणी केली होती. त्यात सुमारे 65 लाख रुपयांचा एसीचा हिशोब मिळून आला नव्हता. त्यामुळे त्यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती असता त्यात मंजुळा आणि विनिकर यांनी संबंधित एसी या शॉप आणि गोदामातून बाहेर काढून त्याची परस्पर मार्केटमध्ये विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
65 लाखांपैकी 33 लाख 50 हजाराचे पेमेंट त्यांना मिळाले होते, ही रक्कम त्यांनी तिघांमध्ये आपसांत वाटून घेतली आहे तर उर्वरित पेमेंट येणे बाकी असल्याचे त्यांच्या चौकशीतून उघडकीस आले. याबाबत काही त्यांनी डिलीव्हरी करणार्या काही टेम्पोसह रिक्षाचालकांची चौकशी केली होती, या चौकशीत त्यांनी मंजुळा आणि विनिकरच्या सांगण्यावरुन त्यांनी विविध ठिकाणी संबंधित एसीची डिलीव्हरी केल्याचे सांगितले. याकामी या दोघांना मंजुळाचा पती मंजुनाथ पुजारीने मदत केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी मंजुळा, मंजुनाथ आणि विनिकर यांना संपर्क साधला असता ते तिघेही मोबाईल स्विच ऑफ करुन पळून गेल्याचे समजले. विनिकर हा त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेला होता.
या घटनेनंतर त्यांनी दहिसर पोलिसांना हा प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या अडीच वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या विनिकर गौतमला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने मंजुळाच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.