शहरात तीन विविध अपघातात तिघांचा मृत्यू

शीव-चेंबूर येथील अपघात; तीन गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शीव आणि चेंबूर येथील दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत दोन वयोवृद्धासह तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शीव आणि आरसीएफ पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मृत व्यक्तींमध्ये एका वयोवृद्धाची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केल्याचे सांगण्यात आले.

पहिला अपघात सोमवारी मध्यरात्री सव्वादोन वाजता शीव येथील मंकीकर जंक्शन, जोगळेकवाडीजवळ झाला. विशाल प्रेमकुमार बालमिकी हा २४ वर्षांचा तरुण ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन, गांधीनगर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून हाऊसकिपिंगचे काम करतो. सोमवारी २६ फेब्रुवारीला तो ठाण्याच्या गांधीनगर नाका परिसरात थांबला होता. यावेळी त्याला त्याचा मित्र अभिषेक अरुणकुमार साहू भेटला. या दोघांनी मुंबईत फेरफटका मारण्याचा प्लान केला होता. तिथेच मद्यप्राशन करुन ते दोघेही त्यांच्या बाईकवरुन मुंबईच्या दिशेने जात होते. रात्री सव्वादोन वाजता ते दोघेही बाईकवरुन जोगळेकरवाडीजवळून जात असताना एका डंपरने अचानक लेफ्ट टर्न घेतल्याने त्यांची बाईक स्लीप झाली होती. डंपरच्या धडकेने ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे अभिषेकला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर विशालवर उपचार सुरु आहेत. त्याच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला असून त्याचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला आहे. या क्रमांकावरुन पळून गेलेल्या डंपरचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

दुसर्‍या अपघाताच्या घटनेत एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला. या वयोवृद्धाची ओळख पटली नाही. ७ जानेवारीला रात्री अकरा ते साडेअकरा वाजता शीव येथील किंग सर्कल ब्रिज, डॉ. बी. ए आंबेडकर रोडवर एका अज्ञात वाहनाने या वयोवृद्धाला धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळाहून पळून गेला होता. जखमी वयोवृद्धाला शीव हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी शीव पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. याच दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या जबानीवरुन मृत वयोवृद्धाचे अपघातामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर जवळपास दिड महिन्यानंतर शीव पोलिसांनी अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु केला आहे.

तिसर्‍या अपघातात मंगल देवीदास वाकचौरे या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ६९ वर्षांचे देवीदास नामदेव वाकचौरे हे चेंबूर येथे राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रविवारी सकाळी साडेआठ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. मंगल ही त्यांची पत्नी असून रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ती वाशीनाका येथील एका स्वामी नरेंद्र महाराज यांच्या सत्संगला गेली होती. आशिष जंक्शनकडे जाणार्‍या रोडने पायी जात असताना महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणार्‍या डंपरने तिला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाला. शीव हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी देवीदास वाकचोरे यांच्या तक्रारीनंतर आरसीएफ पोलिसांनी डंपरचालक विपुल अशोक सरजेने याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page