अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी
गुन्हा दाखल होताच २२ वर्षांच्या तरुणाला अटक व कोठडी
अरुण सावरटकर
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील व्हिडीओ व्हायरची धमकी देऊन एका २४ वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अमन शेख इलियास सिद्धीकी या २२ वर्षांच्या तरुणाला आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने गुरुवार ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रोहित नावाच्या एका तरुणाचा सहभाग उघडकीस आला असून तो मूळचा दिल्लीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अटकेसाठी आंबोली पोलिसांची एक टिम लवकरच दिल्लीला जाणार आहे. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अज्ञात तरुणाशी व्हिडीओ कॉलवर संभाषण करुन त्याच्या सांगण्यावरुन अंगावरील कपडे काढणे या तरुणीला चांगलेच महागात पडले होते. मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या दहा दिवसांत आंबोली पोलिसांनी या गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन मुख्य आरोपीस अटक केली.
२४ वर्षांची तक्रारदार तरुणी ही अंधेरीतील विरा देसाई रोड, आझादनगरची रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ती सोशल साईटवर सक्रिय असून तिचे विविध सोशल साईटवर स्वतच्या नावाने अकाऊंट आहेत. ऑगस्ट महिन्यांत तिला दक्ष बजाज नावाच्या एका तरुणाची फें्रण्ड रिक्वेस्ट आली होती. कुठलीही शहानिशा न करता तिने त्याची फें्रण्ड रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती. याच दरम्यान या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते स्पॅनचॅट, इंटाग्राम, व्हॉटअप या सोशल मिडीयासह मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा दक्ष हा तिच्या व्हिडीओ कॉलवर संभाषण करत होता. संभाषणादरम्यान तो तिला त्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने तिला कपडे काढून न्यूड होण्यास प्रवृत्त करुन तिचे काही अश्लील व्हिडीओ बनविले होते. त्यानंतर त्याने तिच्या नावाने बोगस आयडी तयार करुन तिला मॅसेज पाठविणे सुरु केले होते. त्यात तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. दक्षकडून तिची फसवणुक झाली होती. आता तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे खंडणीची मागणी करत होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी १९ ऑक्टोंबरला तिने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दक्षविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आंबोली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध ७८, ७९, ३०८ (२), ३५१ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता सहकलम ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अमन शेख याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
अमन हा गोरेगाव येथील बांगुरनगर, न्यू म्हाडा टॉवरच्या ३ जी विंग, फ्लॅट १८०५ मध्ये राहत असून त्यानेच तक्रारदार तरुणीला ब्लॅकमेल करुन धमकी दिल्याची कबुली दिली. तिच्याकडून मिळालेली कॅश त्याने रोहितला बँक खात्यात पाठविल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत रोहितला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.