रॉबरीसाठी त्या दोन्ही महिलांवर हल्ला झाल्याचे उघडकीस

पळून गेलेल्या बिहारी नोकरासह तिघांना हैद्रबादहून अटक

0

अरुण सावरटकर
१० जानेवारी २०२५
मुंबई, – एक दिवसांच्या कामासाठी आलेल्या नोकराने त्याच्या नातेवाईकांसोबत एका वयोवृद्घ महिलेसह तिच्या आतेबहिणीवर लोखंडी मसाला कुटण्याच्या मुसळीने केलेला प्राणघातक हल्ला रॉबरीच्या उद्देशाने केल्याचे उघडकीस आले आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी नोकरासह त्याच्या दोन्ही नातेवाईकांना हैद्राबाद येथून आंबोली पोलिसांनी अटक केली. अजीत भिकन मुखिया, सरोज ललवा मुखिया आणि विष्णू नथूनी मुखिया अशी या तिघांची नावे असून ते तिघेही बिहारच्या दरबंगाचे रहिवाशी आहे. रॉबरीच्या उद्देशाने त्यांनी हल्ला केला, मात्र अचानक झालेल्या आरडाओरडीनंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. अटकेच्या भीतीने ते गावी न जाता हैद्राबादला गेले होते. मात्र तेथून पळून जाण्याच्या तयारीत असताना या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेनंतर या तिन्ही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने बुधवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीतील शास्त्रीनगर क्रमांक एक, जिप्सी रोझ इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ७०३ मध्ये शोभा कन्नू बिपीन रेखारी ही ७४ वर्षांची वयोवृद्ध महिला राहते. मंगळवारी ७ जानेवारीला तिच्या घरी काही नातेवाईक आले होते. त्यातच तिचा नोकर बाहेर गेल्याने त्याने एक दिवसांसाठी अजीत मुखियाला त्यांच्या घरी कामासाठी पाठविले होते. ठरल्याप्रमाणे अजीतने सर्वांसाठी जेवण केले होते. दुपारी जेवण केल्यानंतर चंद्रा भंडारी आणि शिला भंडारी या त्यांच्या घरी निघून गेल्या होत्या. यावेळी शोभा या त्यांची आतेबहिण बीणा भट या दोघीही बेडरुम व सोफ्यावर झोपल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता वीणा भट हिचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने शोभा या बेडरुममधून बाहेर आल्या. यावेळी त्यांना अजीत हा बीणा यांच्या डोक्यात लोखंडी मसाला कुटण्याच्या मुसळीने मारहाण करत असल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने त्याने शोभा यांच्या डोक्यातही मुसळीने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या दोघीही गंभीररीत्या जखमी झाल्या. हल्ल्यानतर अजीत तेथून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या शोभा रेखारी आणि बीणा भट यांना तातडीने जवळच्या कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी तीन ते चार विशेष पथकाची नियुक्ती केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, पोलीस निरीक्षक वसंत देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार, चेरले, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप फुंडे, माळी, सुशांतकुमार पाटील, कोगे, पोलीस हवालदार विलास दुलाम, पाटील, शिवाजी कासार, सुनिल घुगे, निखिल बाबर, गोरख पवार, शिल्पेश कदम, प्रदीप कुलत, सचिन साखरे, योगेश नराळे, उत्तेकर, कामठे, सागर घोगळे, आचार्य यांनी तपासाला सुरुवात केली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अजीत हा बिहारच्या दरभंगाचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. हल्ल्यानंतर तो त्याच्या नातेवाईकांसोबत हैद्राबादला पळून गेल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप फुंडे, पोलीस हवालदार प्रदीप कुलात आणि निखील बाबर यांनी हैद्राबाद येथून अजीतसह त्याच्या दोन्ही नातेवाईकंना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. ते तिघेही २१ ते २२ वयोगटातील असून मुंबईत घरकामासह इतर काम करतात. या तिघांना शोभा रेखारी यांच्या फ्लॅटमध्ये रॉबरी करायची होती. ठरल्याप्रमाणे अजीतने शोभासह तिची आतेबहिण बीणा भट यांच्यावर हल्ला केला, मात्र अचानक झालेल्या हल्ल्याने त्यांनी जोरजोरात आरडाओरड करुन लोकांना मदतीसाठी बोलाविले होते. रॉबरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच ते तिघेही पळून गेले होते. मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना हैद्राबाद येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page