चौदा वर्षांच्या शाळकरी मैत्रिणीची बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल
मैत्रिणीचे अश्लील फोटो शाळेसह क्लासेसमध्ये व्हायरल केले
अरुण सावरटकर
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मैत्रिणीचे अश्लील फोटो तिच्याच वर्ग मित्राने व्हायरल केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. आरोपी मित्राने मैत्रिणीचे अश्लील फोटो त्याच्या शाळेसह खाजगी क्लासेसच्या मुला-मुलांनी दाखवून तिची बदनामी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौदा वर्षांच्या अल्पवयीन वर्गमित्राविरुद्ध आंबोली पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत या मुलाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. गुन्ह्यांचा तपास डी. एन नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
४२ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरी परिसरात राहते. बळीत ही तिची चौदा वर्षांची मुलगी असून ती अंधेरीतील एका नामांकित शाळेत शिकते. तिच्या वर्गात चौदा वर्षांचा आरोपी मुलगा शिकत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शिक्षण घेताना त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. काही महिन्यांपूर्वीच त्याने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता. यावेळी ते दोघेही सोशल मिडीयावर एकमेकांच्या संपर्कात होते. स्नॅपचॅटवर मॅसेज पाठवत होते. याच दरम्यान त्याने तिला त्याचे काही अश्लील फोटो स्नॅपचॅटवर पाठविले होते. तसेच तिलाही अश्लील फोटो पाठविण्यास प्रवृत्त केले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला काही अश्लील फोटो पाठविले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला आणि तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. अचानक संबंध तोडल्याने त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने तिला तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तिने स्नॅपचॅटवर पाठविलेले चेहरा दिसत नसलेले फोटो शाळेसह खाजग क्लासेसच्या मुला-मुलींना दाखवून, तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. हा प्रकार अलीकडेच या मुलीच्या लक्षात आला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या माहितीने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
घडलेला प्रकार आंबोली पोलिसांना सांगून तिने आरोपी वर्ग मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पुढील तपास डी. एन नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. १ ऑगस्ट ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा संपूर्ण घडला होता. त्यामुळे मुलाची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. बळीत मुलीचे फोटो त्याने कोणाला व्हायरल केले, ते फोटो त्याने कोणा-कोणाला दाखविले याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.