ऑफिसच्या कामासाठी घरी बोलावून 20 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग

32 वर्षांच्या मॅनेजर महिलेस अटक तर पळालेल्या दोघांचा शोध सुरु

0

अरुण सावरटकर
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – ऑफिसच्या कामासाठी आधी कॅफे आणि नंतर घरी बोलावून एका 20 वर्षांच्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन कंपनीच्या महिला मॅनजरने तिच्यासोबत दोन तरुणांना विनयभंग करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपी मॅनेजर महिलेसह दोन अज्ञात तरुणांविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन सुषमा सुरेशकुमार राव ऊर्फ सुषमाकुमारी या 32 वर्षांच्या आरोपी महिलेस अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 25 ते 30 वयोगटातील दोन्ही तरुण फरार असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

20 वर्षांची तक्रारदार तरुणी ही मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात तिचे आई-वडिल आणि भावांसोबत राहते. तिचे वडिल अकाऊंटचे काम करतात तर ती गेल्या सहा महिन्यांपासून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सकाळी साडेअकरा ते रात्री साडेनऊ असा तिच्या कामाची वेळ आहे. याच कंपनीत सुषमाकुमारी ही मॅनेजर म्हणून काम करते. 8 नोव्हेंबरला तिने तिला कॉल करुन ऑफिसमध्ये मिटींग असून तिथे जागा नसल्याने तिला बाजूलाच असलेल्या कॅफेमध्ये बोलाविले होते. तिथे तिच्यासह तिच्या सहकारी तरुणीला काम करण्यास सांगितले होते. दुपारी तिने पुन्हा तिला कॉल करुन कॅफेमध्ये बसून काम करता येणार नाही म्हणून तिला एका फ्लॅटचे लोकेशन पाठविले होते. त्यानंतर ती अंधेरीतील काजूवाडी, पारशीवाडीतील रेहमतीबाई इमारतीच्या ए विंगच्या फ्लॅटमध्ये 401 मध्ये गेली होती. तिथे सुषमाकुमारी होती.

तिने तो फ्लॅट तिच्या मालकीचा असल्याचे सांगून तिला निवांतपणे हॉलमध्ये बसून काम करण्यास सांगितले. दुपारी त्यांनी एकत्र जेवण केले. सायंकाळी तिने तिला कोक दिले होते. ते कोक प्यायल्यानंतर तिला गुंगी आली होती. काही वेळानंतर तिला उलटी झाली होती. त्यानंतर ती तिथेच झोपून गेली होती. रात्री साडेनऊ वाजता तिला जाग आली असता तिला तिच्या शेजारी बेडवर एक तरुण झोपल्याचे दिसून आले. या तरुणाने शर्ट घातलेला नव्हता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि बाथरुममध्ये गेली. तिथे अन्य एक तरुण होता. त्याला पाहिल्यानंतर ती आणखीन घाबरली होती. तिने तिचा मोबाईलचा शोध घेतला,

या दरम्यान ते तरुण फ्लॅटमधून पळून गेले होते. यावेळी तिला फ्लॅटमध्ये सुषमाकुमारी कुठेच दिसून आली नाही. त्यानंतर ती रिक्षाने तिच्या घरी जाण्यास निघाली. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिच्या भावाला हा प्रकार सांगितला. दुसर्‍या दिवशी त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सुषमाकुमारीसह इतर दोन अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत संंबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रविवारी सुषमाकुमारीला पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पळून गेलेले दोन्ही आरोपी तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या घटनेमागे तिचा उद्देश काय होता. तिने तिला अंधेरीतील कोणाच्या फ्लॅटमध्ये बोलाविले होते. तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. सुषमा ही साकिनाका येथील चांदीवली, अमरित शक्ती सोसायटीच्या व्हाईट लिली नहारच्या 1302/बी मध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकाच गुन्ह्यांत आरोपी महिलेला दोनदा अटक
अटकेनंतर सुषमाकुमारीला रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तिला पोलिसांनी बीएनएनएस 47 प्रमाणे दिलेली नोटीस तिच्या हिंदी भाषेत दिली नाही. तसेच मराठीत दिलेली नोटीस हिंदीत समजावून सांगितली नाही. केस डायरीत तशी पोलिसांनी नोंद केली नाही. त्यामुळे तिला कोर्टाने अटकेतून मुक्त केले होते. या गुनह्यांत पोलिसांनी मिहीर शहा दिल्ली कोर्टाच्या लॉच्या आधारे तिला पुन्हा अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. यावेळी तिला 47 बीएनएनएसची हिंदीमध्ये नोटीस देण्यात आली. या नोटीसवर तिची स्वाक्षरी घेण्यात आली होती. तिला अटक केल्यांनतर तिच्या भावाला अटकेची माहिती देण्यात आल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page