५० कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी अनिल देसाई यांची सात तास चौकशी
पक्षाच्या घटनेनुसार आपण काम करत असल्याचा दावा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मार्च २०२४
मुंबई, – सुमारे ५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांची मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सात तास चौकशी केली होती. अनिल देसाई हे सकाळी पावणेअकरा वाजता कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची सायंकाळी सहा वाजता चौकशी पूर्ण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना अनिल देसाई यांनी आपण पक्षाच्या घटनेनुसार काम करत असल्याचा दावा करताना पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले होते. जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपासोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केले होते. त्यानंतर या दोन्ही गटात खरी शिवसेना कोणाची यावरुन प्रचंड वाद सुरु झाला होता. याच दरम्यान निवडणुक आयोगासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. असे असताना ठाकरे गटाने आयकर विभागासह टीडीएस लॉन इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करुन सुमारे ५० कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता.
३० जानेवाररीला शिंदे गटाचे किरण पावसकर, बालाजी किणीकर, संजय मोरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार संपूर्ण प्रकार सांगून चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रार अर्जानंतर पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती. याच चौकशीचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. अनिल देसाई यांना चौकशीसाठी मंगळवारी ५ मार्चला बोलविण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजता अनिल देसाई हे पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते.
सायंकाळी सहापर्यंत त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांना काही कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. सायंकाळी सहा वाजता चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मिळाले होते. त्यामुळे ती मंगळवारी चौकशीसाठी हजर राहिलो होतो. आर्थिक गुन्हे शाखेने जी माहिती मागवली आहे, ती माहिती त्यांना दिली आहे. माझ्याकडून पोलिसांना सहकार्य केले जाणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या निर्देशानुसार आणि पक्ष घटनेनुसार आम्ही काम करत आहोत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्याकडे असलेली सर्व माहिती ती पोलिसांना दिली आहे असे सांगितले.