पोलीस शिपायाची पिस्तूल-जिवंत काडतुसे पळविणारा गजाआड

तक्रारदार पोलीस शिपाई जयदेव ठाकरे यांचा सुरक्षारक्षक

0

अरुण सावरटकर
3 मार्च 2026
मुंबई, – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र जयदेव बाळासाहेब ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या एका पोलीस शिपायाची देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि ओळखपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्याने पळविली होती, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच काही तासांत पळून गेलेल्या आशिष पिंटू कश्यप या मुख्य आरोपीस वांद्रे रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली. त्याच्याकडून चोरीची पिस्तूल, काडतुसे आणि ओळखपत्र लवकरच हस्तगत केले जाणार आहेत. शेवटची लोकल गेल्याने तक्रारदार शिपाई वांद्रे रेल्वे स्थानकातील बाकड्यावर झोपल्यानंतर आशिषने त्यांची बॅग चोरी करुन रेल्वे स्थानकातून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

सुशांत जयराम गायकवाड हे 32 वर्षाचे तक्रारदार अंबरनाथ, पालेगाव रोड, मिरापार्क अपार्टमेंटमध्ये राहतात. ते नवी मुंबईतील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 11 मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र जयदेव ठाकरे यांच्या वांद्रे येथील कलानगर बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. 27 फेब्रुवारीला सकाळी पावणेनऊ वाजता ते मासिक गोळीबार सरावासाठी गोरेगाव येथील एसआरपी ग्रुप क्रमांक आठ फायरिंग बटावर गोळीबार सरावासाठी गेले होते. गोळीबार सराव पूर्ण झाल्यानंतर ते जयदेव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी गेले होते.

रात्री साडेदहा वाजता जयदेव ठाकरे यांनी सुट्टी दिल्यानंतर ते त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या बॅगेत सरकारी पिस्तूल, जिवंत काडतुसे, ओळखपत्र आणि कपडे ठेवले होते. घरी जाण्यापूर्वी ते त्यांचा मित्र विशाल सिंग यांच्यासोबत वांद्रे येथे फिरायला गेले होते. रात्री अडीच वाजता ते वांद्रे रेल्वे स्थानकात आले. शेवटची लोकल गेल्यामुळे ते फलाट एकच्या माहिमकडे जाणार्‍या बाकड्यावर झोपले होते. पहाटे साडेचार वाजता त्यांना जाग आली. यावेळी त्यांना त्यांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे दिसून आले. ते झोपेत असल्याचा फायदा घेऊन या व्यक्तीने त्यांचे पोलीस ओळखपत्र दिड लाख रुपयांची एक देशी बनावटीचे पिस्तूल, 29 हजाराचे 29 जिवंत काडतुसे, कपडे आणि बॅग असा 1 लाख 79 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वांद्रे रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस शिपायाचे पिस्तूल, जिवंत काडतुसे चोरीस गेल्याने त्याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत वांद्रे रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सोमवारी आशिष कश्यप या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली.

चौकशीत आशिष हा चोरीनंतर रेल्वे स्थानकाबाहेर आला. बॅगेची तपासणी केल्यानंतर त्याला त्यात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडले. पिस्तूल आणि जिवंत पाहिल्यानंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने ती बॅग तिथे पार्क केलेल्या बाईकवर ठेवून पलायन केले होते. वांद्रे येथून दादर आणि नंतर तो विद्याविहारला पळून गेला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहेत. त्याच्याकडून चोरीची शासकीय देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, पोलीस ओळखपत्र आदी मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page