बेरोजगारी आणि उपासमारी ही बांगलादेशातील दोन गंभीर विषय आहे. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली आहे. भारतात विशेषता मुंबईत कोणीही उपाशी राहत नाही याची खात्री पटल्याने मिळेल ते काम करण्यासाठी घुसखोर बांगलादेशी नागरिक मुंबईत सर्रासपणे वास्तव्यास असल्याचे अनेक कारवाईतून उघडकीस आले आहे. बांगलादेशातून कोलकातामार्गे प्रवेश करुन भारतातील विविध शहरात राहायचे, भारतीय नागरिक असल्याचे बोगस पुरावे सादर करायचे आणि आपण भारतीय नागरिक आहोत असे सांगून नोकरी मिळवायची अशी या बांगलादेशी नागरिकांची पद्धत आहे. गेल्या काही मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, आय शाखा आणि एटीएसने अशाच अनेक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली होती. मात्र ही कारवाई सुरु असताना मुंबई आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या काही कमी नाही. ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस कारवाईतून उघड झाली आहे. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीची गंभीर दखल घेत अशाच एका बांगलादेशी टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्या अटकेने बांगलादेशी नागरिकांनी भारतात विशेषता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरात कशा प्रकारे आपले बस्तान बसविले आहे याची धक्कादायक माहिती चौकशीतून बाहेर आली. त्यामुळे निनाद सावंत व त्यांच्या पथक नक्कीच कौतुकास्पद पात्र आहे.
बोरिवली परिसरात काही बांगलादेशी नागरिक सतत कामानिमित्त येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली होती. या माहितीनंतर त्यांनी गुन्हे शाखेसह एटीएस पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी बोरिवलीतील एल. टी रोड, आकाश स्विट मार्ट येथून सुमन मोमीन सरदार, ओमर फारुख मोल्ला आणि सलमान आयुब खान या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. ते तिघेही कुठल्याही वैध प्रवाशी कागदपत्राशिवाय भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकार्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय हद्दीत प्रवेश करुन आले होते. बांगलादेशी नागरिक असताना त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड असे बोगस दस्तावेज सापडले होते. त्यामुळे त्यांनी स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस शिपाई सच्चिदानंद मनोहर रेवाळे यांच्या तक्रारीवरुन बोरिवली पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. बोरिवली कोर्टात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळाली होती.
तपासादरम्यान त्यांनी त्यांचे इतर काही सहकारी विविध परिसरात राहत असल्याची कबुली दिली. या कबुलीसह त्यांच्याकडून मिळालेल्या मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद निंबाळकर, प्रदीप काळे व अन्य पोलीस पथकाने अतिकुमल अकिलउद्दीन मुल्ला, सैदुल सफरअली गामन, मुस्ताक अली कुतुबुद्दीन तरबदार, फिरोज फलउहक मोल्ला यांना नालासोपारा तर रहिम मोईउद्दीन मंडल ऊर्फ रहिमउद्दीन मंडल, रॉनी शफीकुल शेख, इनामुल कमल सरदार, मसुद राणा इंद्रीस गाझी, रिपो रोमेन ढाली, मोनीरुल मोहम्मद मुल्ला, आरिफ शौकत विश्वास, मसुद बिल्ला अश्रफ मंडल, दिलावर इंद्रीस गाझी आणि रब्बी कजल मंडल या बांगलादेशी नागरिकांना विरार येथून अटक केली. यातील बहुतांश नागरिकांना पॅनकार्ड, जन्मदाखला, आधारकार्ड आणि पासपोर्ट होते. भारतीय दस्तावेज मिळविण्यासाठी त्यांनी बोगस दस्तावेज सादर केल्याची कबुली दिली. याकामी त्यांना साईनाथ येईलवाड आणि गंगाप्रसाद धोंडिबा करपे यांनी तर पासपोर्टसाठी कुसूम संदीप गायकवाड या महिलेने मदत केल्याचे उघड झाले. साईनाथ हा मूळचा पुण्याचा रहिवाशी असून त्याचा चंदननगर परिसरात समर्थ इंटरप्रायजेस नावाची एक कंपनी आहे. त्याच्या कार्यालयाची झडतीदरम्यान पोलिसांनी गंगाप्रसाद धोडिंबा करपे याला अटक केली. कुसूम ही महिला पुण्यात राहते. तिनेच साईनाथ आणि गंगाप्रसाद यांच्याकडून मिळालेल्या बोगस दस्तावेजाच्या मदतीने दहा बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट मिळवून दिले होते. त्यामुळे २२ ऑक्टोंबरला तिला तिच्या पुण्यातील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. या कारवाईत कुसूमच्या घरातून पोलिसांनी तिचा लॅपटॉप, मोबाईल, भाडेकराराची प्रती जप्त केल्या. कुसूमला मिठू नावाचा एक तरुण मदत करत होता. त्यामुळे मिठूचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मिठू शौफीकुल शेख याच्यासह त्याचे दोन बांगलादेशी सहकारी मुबीन जावेद मंडल, सुजौन शोरीफल शेख या तिघांना २८ ऑक्टोंबरला पोलिसांनी अटक केली.
कुसुमच्या चौकशीदरम्यान तिच्याकडे लक्ष्मण सुरेश धडे हा चालक म्हणून कामाला होता. त्याने तिला नोकरीसाठी त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फोटो दिले होते. या दस्तावेजाचा तिने दुरुपयोग करुन बांगलादेशी नागरिकांसाठी पासपोर्ट तसेच भाडेकरार मिळवून दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. तपासात बांगलादेशातून पळून आलेल्या नागरिकांना ही टोळी भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज सादर म्हणजेच पॅनकार्ड, आधारकार्ड, जन्मदाखला, पासपोर्टसह इतर दस्तावेज बनवून देत होती. त्यासाठी या बांगलादेशी नागरिकांकडून ठराविक रक्कमेचे कमिशन घेतले जात होते. बोरिवली पोलिसांचे एक विशेष पथक कोलकाता येथे गेले होते. तपासात यातील बहुतांश बांगलादेशी नागरिक बांगलादेशातून कोलकाता आणि नंतर मुंबईसह इतर शहरात आल्याचे उघडकीस आले. कोलकाता येथे वास्तव्यास असताना त्यांनी त्यांचे बोगस जन्मदाखले बनविले होते. त्यामुळे या पथकाने २४ परगाणा, बशीरहट येथून मोठ्या प्रमाणात बोगस जन्मदाखले जप्त केले होते. ते दाखले त्यांना खैरउल नावाच्या व्यक्तीने बनवून दिले होते. त्याचा शोध घेताना तो बांगलादेशात पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. कोलकाता येथे वास्तव्यास असलेला राहुल लक्ष्मण सिंग ऊर्फ शाहरुख जमशेद खान हा या संपूर्ण कटातील मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. मात्र बोरिवली पोलिसांच्या कारवाईनंतर शाहरुख खान हादेखील बांगलादेशात पळून गेल्याची माहिती संबंधित पोलीस पथकाला मिळाली होती.
चौकशीदरम्यान या बांगलादेशी नागरिकांनी तेथील उपासमारी आणि बेरोजगारीला कंटाळून भारतात अनधिकृतपणे प्रवेश करुन वास्तव्य करत असल्याची कबुली दिली. बांगलादेशात पासपोर्ट व्हिसासाठी साधारण चौदा लाख रुपये खर्च येतो. मात्र भारतात अवघ्या पाच लाखांत पासपोर्ट व्हिसा मिळतो. कोलकाता कार्यालयात पासपोर्टसाठी मॅनेज करण्यासाठी तीस ते पत्तीस हजार रुपये खर्च येतो, मात्र महाराष्ट्रात आठ ते दहा हजारात पासपोर्ट मिळत असल्याने ते बांगलादेशी नागरिक महाराष्ट्रातून पासपोर्ट बनविण्यावर अधिक भर देतात. त्यामुळे या आरोपींनी पुण्यातून बोगस पासपोर्ट मिळविल्याची कबुली दिली. दुसरीकडे आखाती देशात बांगलादेशी कागदपत्रांमुळे कमी रेटींगमुळे नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तरी कमी पगाराची नोकरी मिळते. मात्र भारतीय पासपोर्ट आणि व्हिसावर त्यांना जास्त पगाराची आणि सन्मानाची नोकरी मिळते. त्यांच्याकडून दहा बोगस भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. या पासपोर्टचे व्हॅरीफिकेशन पुण्याच्या येरवडा आणि वानवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बोगस रहिवाशी रहिवाशी पत्त्यावर झाले होते. त्यांनी सादर केलेले लिव्ह ऍण्ड लायसन्स करार बोगस होते. या गुन्ह्यांत आतापर्यंत बोरिवली पोलिसांनी बावीस आरोपींवर अटकेची कारवाई केली होती. त्यात दोन भारतीयांसह वीस आरोपी बांगलादेशी नागरिकांचा समावेश असून ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कुसूम या एकमेव महिला आरोपीला विशेष सेशन कोर्टाने नोव्हेंबर २०२३ रोजी जामिन मंजूर केला असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे. या गुन्ह्यांत राहुल सिंग ऊर्फ शाहरुख खान, रशीद आणि साईनाथ येईलवाड अशा तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, मोठ्या प्रमाणात बोगस जन्मदाखले, आधारकार्ड, पॅनकार्ड, कलर प्रिंटर, फिंगर स्कॅनर, संगणक हार्डडिस्क, बोगस दस्तावेजाचा सॉफ्ट डाटा, मोबाईल, भाडेकराराची प्रती, बँकेचे पासबुक आदी मुद्देमाल जप्त केला आहे. कामानिमित्त काही बांगलादेशी नागरिक बोरिवली परिसरात येत असल्याच्या माहितीवरुन बोरिवली पोलिसांनी भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी टोळीचा पर्दाफाश केला. या बांगलादेशी नागरिकांना किती सहज भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मिळते हे त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजू परुळेकर