खाजगी कंपनीच्या बँक खात्यातून 75 लाखांच्या अपहाराचा पर्दाफाश
तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपी महिलेस अटक
अरुण सावरटकर
5 जानेवारी 2026
मुंबई, – गोरेगाव येथील सुयोग पॅकेजिंग कंपनीच्या बँक खात्यातून झालेल्या सुमारे 75 लाखांच्या अपहाराचा बांगुरनगर पोलिसांना पर्दाफाश करण्यात यश आले आहे. याच गुन्ह्यांत गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. अशिता निखिल गोस्वामी असे या महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नितीन सुरेश झुनझुनवाला हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांची सुयोग पॅकेजिंग नावाची एक कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यालय गोरेगाव येथील एसआरए डायनोस्टिक सेंटर, सिद्धपुरा इंडस्ट्रिज इस्टेटमध्ये आहे. कंपनीचे एका खाजगी बँकेत खाते असून ते खाते त्यांच्या मोबाईल आणि ईमेल आयडीशी लिंक आहे. जुलै 2025 रोजी सुयोग पॅकेजिंग कंपनीची आर्थिक अवस्था बिकट असल्याने त्यांनी कंपनीचे फायनासियल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी ऑडिटचे काम सीए भरत हलन अॅण्ड असोशिएट्स कंपनीला दिले होते. या कंपनीला त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यासह आर्थिक व्यवहाराची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
संबंधित ऑडिट पूर्ण होताच कंपनीने त्यांना त्यांचा एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून अनेक फ्रॉड ऑनलाईन व्यवहार झाल्याचे नमूद करणयात आले होते. या अहवालानंतर नितीन झुनझुनवाला यांनी स्वत कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारासह बॅक स्टेटमेंटची पाहणी केली होती. त्यात त्यांच्या परवानगीशिवाय अनेक ऑनलाईन वयवहार झाल्याचे दिसून आले. या व्यवहाराबाबत त्यांनी कोणालाही बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा ईमेल आयडी शेअर केला होता. तरीही त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे 75 लाखांचा व्यवहार झाला होता. ही रक्कम अशिता गोस्वामी या महिलेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. अशितासह इतर आरोपींनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती प्राप्त करुन संबंधित ऑनलाईन व्यवहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे अशिता गोस्वामीसह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी 318 (4), 319 (2), 3 (5) भारतीय न्याय सहिता सहकलम 66 (डी), 66 (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या अशिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत अशिताचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आले होते.
अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिने तिला बुधवार 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तिच्या बँक खात्यात 75 लाखांची ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्यानतर ती रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळविण्यात आले तर काही रक्कम बँकेतून काढण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्यांत तिला इतर काही आरोपींनी मदत केली असून या सर्व आरोपींची नावे पोलिसांना प्राप्त झाली आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.