बोगस दस्तावेज सादर करुन बँकेची सव्वाकोटीची फसवणुक

एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपी महिलेस अटक

0

अरुण सावरटकर
4 मार्च 2026
मुंबई, – बोगस कागदपत्रांच्या आधारे व्यवसायासाठी ओव्हरड्राफ्ट लोनसाठी अर्ज करुन एका नामांकित बँकेची सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केल्याप्रकरणी एका मुख्य वॉण्टेड आरोपी महिलेस समतानगर पोलिसांनी अटक केली. सोनाली आनंदा पोवार असे या महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच सोनाली पळून गेली होती, अखेर एक वर्षांनी तिला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तिचा पती आनंदा शिवाजी पोवार हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राकेश धनाजी मोरे हे बोरिवलीतील रहिवाशी असून सध्या एका नामांकित बँकेत कामाला आहे. 2022 ते 2024 या कालावधीत ते बँकेच्या कांदिवलीतील लोखंडवाला शाखेत शाखा प्रबंधक म्हणून काम करत होते. जुलै 2022 रोजी त्यांच्या बँकेत आनंदा पोवार व त्याची पत्नी सोनाली पोवार हे दोघेही त्यांच्या व्यवसायासाठी ओव्हरड्राफ्ट लोनसाठी आले होते. यावेळी त्यांना लोनसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांचे केवायसीसह इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, त्यांच्या संस्कार अ‍ॅग्रो प्रोडक्टस कंपनीचे कागदपत्रे सादर केले होते. या कागदपत्रांच्या आधारे त्यांना बँकेने एक कोटी वीस लाख रुपयांचे लोन मंजूर केले होते. त्यासाठी त्यांनी बँकेत तारण म्हणून त्यांच्या ठाण्यातील रुस्तजी अर्बन, एबीसीडी सीएचएस, रुस्तमजी अ‍ॅकुरा या फ्लॅटचे मूळ कागदपत्रे सादर केले होते.

ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या बँक खात्यात लोनची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ऑक्टोंबर 2023 पर्यंत त्यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार नियमित सुरु होते. मात्र नंतर त्यांनी लोनचे हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी तारण ठेवलेल्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई बँकेने सुरु केली होती. यावेळी बँकेच्या कर्मचार्‍यांना आनंदा पोवार आणि सोनाली पोवार यांनी पी मणिकम यांच्याकडून संबंधित फ्लॅट घेतल्याचे नमूद केले होते. मात्र प्रत्यक्षात या फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झाला नव्हता. फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा दोन कोटी वीस लाखांमध्ये झाला, त्यापैकी त्यांनी त्यांना पन्नास लाख रुपये दिले, उर्वरित रक्कम लोन काढून देण्याचे आश्वासन दिले होते,

मात्र त्यांनी उर्वरित रक्कम न दिल्याने त्यांच्या नावावर फ्लॅट झाला नव्हता. अशा प्रकारे त्यांनी खरेदी-विक्री न झालेल्या फ्लॅटचे बोगस दस्तावेज सादर करुन व्यवसायासाठी ओव्हरड्राफ्ट लोन घेऊन बँकेची एक कोटी वीस लाख रुपयांची फसवणुक केली हदोती. हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने राकेश मोरे यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आनंदा पोवार आणि सोनाली पोवार या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी पती-पत्नी पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या या कटातील मुख्य आरोपी महिला सोनाली पोवार हिला पोलिसांनी अटक केली. चौकशीत तिने तिच्या पतीच्या मदतीने बँकेची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page