पत्नीची फ्लाईंट मिस झाल्याने मुंबई-बंगलोर विमानात बॉम्बचा कॉल
गुन्हा दाखल होताच कॉल करणार्या आरोपीस बंगलोर येथून अटक
राजू परुळेकर
५ मार्च २०२४
मुंबई, – पत्नीची फ्लाईंट मिस झाल्याने एका व्यक्तीने अकासा एअरवेजच्या मालाड येथील कॉल सेंटरला मुंबई-बंगलोर विमानात बॉम्ब असल्याच्या कॉल करुन एकच खळबळ उडवून दिली होती. विमानाची संपूर्ण तपासणीदरम्यान बॉम्ब ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कॉल करणार्या आरोपीस बंगलोर येथून एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली. विलास रंगनाथ बाकडे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. फ्लाईंट मिस झाल्यामुळे बॉम्बचा बोगस कॉल करणे विलासला चांगलेच महागात पकडले आहे.
निलेश यशवंत घोंगडे हे विलेपार्ले येथील तेजपाल रोड, ओल्ड अशोककुंजमध्ये राहतात. ऑक्टोंबर २०२२ पासून ते अकासा एअरलाईन्समध्ये सिक्युरिटी मॅनेजर म्हणून कामाला आहेत. सध्या त्यांची नेमणूक डोमेस्टिक एअरपोर्टवर आहे. गेल्या आठवड्यात ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना लोअर परेल येथील सिक्युरिटी अधिकारी निलेश मधुवार यांनी कॉल करुन त्यांच्या मालाड येथील कॉल सेंटरला एका अज्ञात व्यक्तीने दुपारी दिड वाजता मुंबईहून बंगलोरला विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी या विमानाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना फ्लाईंटमध्ये १६७ प्रवाशी असून सध्या ते विमान अल्फा एक येथे लॅडिंगसाठी सज्ज असल्याचे समजले होते. धमकीच्या कॉलनंतर त्यांनी एअरपोर्ट पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती.
सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरुन नंतर संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची बॉम्बशोधक पथकाने श्वान पथकासोबत तपासणी केली होती. मात्र विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. विमानात बॉम्ब असल्याच्या कॉल आल्यानंतर सर्व प्रवाशांना एअर इंडिया हँगरसमोरील इको ९ या ठिकाणी आयसोलेटेड करण्यत आले होते. बॉम्बच्या माहितीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व क्लिअर असल्याचे उघड होताच संबंधित एअरलाईन्स अधिकार्यासह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यानंतर सर्व प्रवाशांना पुन्हा विमानात बसण्यास सांगण्यात आले.रात्री दिड वाजता विमानाला बंगलोर येथे जाण्यास हिरवा कंदिल देण्यात आला होता. या घटनेनंतर निलेश घोंगडे यांनी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात बॉम्ब असल्याचा कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपी कॉलरविरुद्ध ५०५ (१), (ब), ५०६ (२), ५०७ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत एअरपोर्ट पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम कोरेगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान ज्या मोबाईल क्रमांकावरुन हा कॉल आला होता, त्याची माहिती काढण्यात आली. यावेळी हा मोबाईल क्रमांक विलास बाकडे याचा असून तो बंगलोर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांची एक टिम बंगलोरला गेले होते. या पथकाने विलासला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानेच मुंबई-बंगलोर विमानात बॉम्ब असल्याचा कंपनीच्या मालाड येथील कॉल सेंटरला माहिती दिल्याची कबुली दिली.
तपासात त्याची पत्नी कामानिमित्त मुंबईत आली होती. काम संपल्यानंतर ती पुन्हा बंगलोरला जाण्यासाठी जात होती. मात्र तिची फ्लाईट मिस झाली होती. त्यामुळे तिने फोनवरुन ही माहिती विलासला दिली. फ्लाईंट मिस झाल्याने त्याची पत्नी बंगलोरला वेळेवर पोहचू शकली नाही. त्यामुळे त्याने कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हिस कक्षेला कॉल करुन विनंती केली होती. बॉम्बची माहिती सांगितल्यानंतर विमान थांबेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने हा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले. मात्र हा कॉल करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.