फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड डॉक्टरला तीन महिन्यांनी अटक
हॉस्पिटल सेटअपच्या नावाने 1.15 कोटीची फसवणुकीचा आरोप
अरुण सावरटकर
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – हॉस्पिटल सेटअप करण्याच्या नावाने एका पती-पत्नीची एक कोटी पंधरा लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील एका वॉण्टेड आरोपीस तीन महिन्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. श्याम महानंद झा असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अवधेशकुमार झा आणि शाहिद कापाडिया हे दोघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
लिना आशिष पाटील ही महिला बोरिवलीतील एस. व्ही रोड, कोरा केंद्र, सुमरेनगरात राहते. सात वर्षापूर्वी तिची डॉ. श्याम झा याच्याशी ओळख झाली होती. त्याने लिना व तिचे पती आशिष पाटील यांना हॉस्पिटलसाठी एक जागा खरेदी करुन हॉस्पिटलच्या सेटअपसाठी 60 कोटीची गरज असल्याचे सांगितले होते. त्यापैकी 45 कोटी जागेसाठी तर पंधरा कोटी हॉस्पिटल बांधणीसाठी येणार असल्याचे सांगितले होते. हॉस्पिटलसाठी त्याने त्यांच्याकडे गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. जागा खरेदीसाठी त्यांनी दहा टक्के गुंतवणुक करावी, हॉस्पिटल सुरु झाल्यानंतर त्यांना चांगला शेअर आणि गुंतवणुक रक्कमेवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून लिना पाटीलने 1 कोटी 4 लाख 50 हजार रुपये तर तिचे पती 11 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
हा संपूर्ण व्यवहार डॉ. श्याम झा, अवधेशकुमार झा आणि शाहिद कापाडिया यांच्यासमोरच झाला होता. या व्यवहारानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलसाठी जागा घेतली नाही किंवा सेटअप केले नव्हते. लिना आणि आशिष पाटील यांनी दिलेल्या 1 कोटी 15 लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या गुंतवणुक रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही.
हॉस्पिटल सेटअपच्या बहाण्याने या तिघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच लिना व आशिष पाटील यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर डॉ. श्याम झा, अवधेशकुमार झा आणि शाहिद कापाडिया या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या डॉ. श्याम झा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.