गुंतवणुकीवर तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून बेस्ट कर्मचार्यांना गंडा
गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या बेस्ट कर्मचार्याला अटक
अरुण सावरटकर
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – गुंतवणुकीवर तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून आपल्याच सहकारी बेस्ट कर्मचार्यांची फसवणुक करणार्या एका वॉण्टेड आरोपी बेस्ट कर्मचार्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. संजय पुंडलिक पगारे असे या आरोपीचे नाव असून संजय हा बेस्टमध्ये चालक म्हणून कामाला आहे. त्याने तीन विविध व्हॉटअप ग्रुप तयार करुन एका बोगस कंपनीची गुंतवणुक योजना सांगून अनेक बेस्ट कर्मचार्यांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
प्रकाश मंजिराम भदाणे हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत मालाडच्या मालवणी व्हिलेज परिसरात राहतात. मालवणी डेपोमध्ये ते वाहक म्हणून काम करत होते. संजय पगारे हा त्यांच्या परिचित असून तोदेखील बेस्ट बसमध्ये चालक म्हणून काम करत होता. गेल्या पाच वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. जानेवारी 2022 साली संजय पगारे याने बेस्ट कर्मचार्यांसाठी तीन वेगवेगळ्या व्हॉटअप ग्रुप सुरु केले होते. त्यात बेस्ट ग्रुप डेव्हलोप्मेंट, एआय मार्केटिंग व्हीआयपी लिडर आणि बीटफिल्टर व्हीआयपी लिडर्स असे या व्हॉटग्रुपचे नाव होते. या ग्रुपमध्ये बहुतांश बेस्ट कर्मचार्यांना अॅड करण्यात आले होते. त्यात प्रकाश भदाणे यांचाही समावेश होता. याच व्हॉटअप ग्रुपच्या माध्यमातून त्याने टेलव्हिन लाईफ नावाच्या कंपनीची विविध गुंतवणुक योजना सुरु असल्याचे सांगून अनेकांना या कंपनीत गुंतवणुक करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी त्याने कंपनीची एक वेबसाईट लिंक पाठविली होती.
त्यातील एका योजनेत एक ठराविक रक्कम गुंतवणुक केल्यास त्यांना काही दिवसांत तीन पट परताव्यासह मूळ रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. शंभर टक्के पैसे मिळत असल्याचा दावा करुन त्याने अनेक बेस्ट कर्मचार्यांना कंपनीच्या विविध योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या आमिषाला बळी पडून प्रकाश भदाणे यांच्यासह त्यांचे इतर सहकारी राज नारायण यादव, लक्ष्मण धोत्रे, रोहिदास मडके, विकास म्हात्रे, मनोज, परेश म्हात्रे नईम शेख, जगदीश भालेराव, चिंतन संकल्प, सुनिल लोकरे, निलेश शिनोले, समीर शेख आणि महेश सुजी यांनी 16 लाख 43 हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने गुंतवणुक रक्कमेवर तीन पट रक्कम दिली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संजय पगारेकडे विचारणा सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना कोणाची फसवणुक होणार नाही. सर्वांना ठरल्याप्रमाणे तीन पट रक्कम मिळेल असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
प्रकाश भदाणे यांच्यासह इतर पाच बेस्ट कर्मचार्यांची सुमारे दहा लाखांचा परस्पर अपहार त्याने त्यांची फसवणुक फसवणुक केली होती. त्यांच्याकडून सतत पैशांसाठी विचारणा होत असल्याने तो त्याचा मोबाईल बंद करुन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच प्रकाश भदाणे यांनी त्यांच्यासह इतर बेस्ट कर्मचार्यांच्या वतीने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संजय पगारे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसांनी शोध सुरु होता. गेल्या एक महिन्यांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वीच मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
चौकशीत त्याने फसवणुकीच्या उद्देशानेच बोगस कंपनी उघडून त्यात अनेक बेस्ट कर्मचार्यांना तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याची माहिती काढली जात आहे.