शेअर गहाण ठेवून साडेतीन कोटीच्या कर्जाच्या बहाण्याने फसवणुक

गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला अटक तर बहिणीचा शोध सुरु

0

अरुण सावरटकर
7 जानेवारी 2026
मुंबई, – नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी शेअर गहाण ठेवून साडेतीन कोटीच्या कर्जाच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून उसने घेतलेल्या 69 लाखांचा अपहार करुन फसवणुक केलेल्या कटातील आरोपी भावाला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली. जतीनकुमार अमृतलाल उनाडकट असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत जतीनकुमारची बहिण संगीता अमृतलाल उनाडकट ही सहआरोपी असून तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोन्ही आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

प्रेमकुमार जगदीश वर्मा हे विरार येथे राहत असून ते फ्रीलान्सर म्हणून काम करतात. 2017 ते 2023 या कालावधीत डायरेक्ट सेल्स एजन्सीमध्ये काम करत होते. तिथे काम करताना त्यांनी अनेकांना मल्टिनॅशनल बँकेतून पर्सनल लोन मिळवून दिले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी संगीताला 25 लाखांचे लोन दिले होते. यावेळी तिने तिचा भाऊ जतीनकुमारशी त्यांच्याशी ओळख करुन देताना तो शेअर ट्रेडिंग आणि बल्क डिलिंग करत असल्याचे सांगितले. जानेवारी 2024 रोजी प्रेमकुमारने नोकरी सोडली होती. तो नवीन कामाच्या शोधात होता. यावेळी संगीता आणि जतीनकुमारने त्यांना कांदिवलीतील सरोवर हॉटेलजवळ कामानिमित्त बोलाविले होते. यावेळी त्यांनी त्यांना बुम लिफ्ट नावाचा एक नवीन व्यवसाय सुरु करणार असल्याचे सागून त्यासाठी किमान साडेतीन कोटीची गरज आहे.

व्यवसायासाठी त्यांना सुरुवातीला 90 लाखांची गरज होती. ही रक्कम त्यांनी त्यांना देण्याची विनंती केली होती. गरज पडल्यास तो त्याचे शेअर त्यांच्या नावाने करुन या शेअरवर कर्ज काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रेमकुमार यांनी त्यांचे विरार येथील फ्लॅटची 86 लाखांना विक्री केली होती. त्यानंतर त्याने जतीनकुमारला त्याचे शेअर त्यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्यासाठी तसेच याच शेअरवर कर्ज काढण्याासाठी जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत टप्याटप्याने 81 लाख रुपये घेतले होते. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात जतीनकुमार हा त्याचे शेअर त्यांच्यावर नावावर करणार आणि याच शेअरवर ते बँकेतून कर्ज काढतील असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे एक डिमॅट खाते ओपन केले होते.

यावेळी त्याने त्यांच्या डिमॅट खात्याचा पासवर्ड शेअर ट्रान्स्फर करण्यासाठी घेतला होता. काही दिवसांनी त्याने त्याच्या लॅपटॉपमधून त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर ट्रान्स्फर केल्याचे भासविले. त्यात वेगवेगळ्या कंपनीचे शेअर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या शेअरवर त्यांना 2 कोटी 80 लाख 30 हजार 188 रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे एका खाजगी अर्थपुरवठा कंपनीकडून मंजूर झाल्याचे पत्र दाखविले. मात्र बरेच दिवस उलटूनही कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर जतीनकुमार आणि संगीता त्यांना वेगवेगळे कारण सांगत होते. लवकरच कर्ज मंजूर होऊन ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगून त्यांना टाळण्यचा प्रयत्न करत होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने संबंधित कंपनीकडे कर्जाविषयी चौकशी केली होती. यावेळी त्यांना जतीनकुमारने त्यांच्याकडे ट्रान्स्फर केलेले शेअर प्रत्यक्षात कंपनीत गहाण ठेवले नाही. त्यामुळे त्यांना कुठलेही कर्ज मंजूर झाले नाही. त्यानंतर ते त्यांच्या बँकेत गेले असता त्यांना ते शेअर त्यांच्या डिमॅट खात्यात डेमो कामासाठी वापरले जाणारे स्टॉकमध्ये आहे. ते फक्त अभासी असून ट्रेडिंगच्या सरावासाठी आहे. प्रत्यक्षात त्यांच्या अकाऊंटवर कोणतेही शेअर ट्रान्स्फर झाले नसल्याचे समजले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला. यावेळी त्यांनी दोन्ही बहिण-भावांकडे विचारणा केली,

मात्र ते दोघेही त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांनी सिक्युरिटी म्हणून दिलेला धनादेश बँकेत टाकला, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे व्यवसायासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी जतीनकुमारने त्यांना 1 लाख 77 हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित 69 लाख 18 हजाराचा परस्पर अपहार करुन त्याचीं फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी कांदिवली पोलिसांत दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जतीनकुमार आणि संगीता या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना बुधवारी 7 जानेवारीला जतीनकुमारला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याच्यासह त्याच्या बहिणीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page