8.69 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या माजी अधिकार्याला अटक
राजीनामानंतर कंपनीच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार केल्याचे उघड
अरुण सावरटकर
23 जानेवारी 2026
मुंबई, – तीन वर्षांपूर्वी कंपनीचा राजीनामा देऊन नोकरी सोडलेल्या अकाऊंट विभागच्या एका माजी वरिष्ठ लेखा अधिकार्याने कंपनीच्या बँक खात्याच्या लॉगिन आयडीसह पासवर्डचा दुरुपयोग करुन कंपनीच्या 8 कोटी 69 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच गेल्या दिड महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या या अधिकार्याला अखेर समतानगर पोलिसांनी अटक केली. जयप्रकाश बसंतीलाल सोडानी असे या 37 वर्षीय अधिकार्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच गुन्ह्यांत त्याची पत्नी कविता माहेश्वरी आणि इतर बँक खातेदार सहआरोपी आहेत. त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विपीन दिलीप वरखावत हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत बोरिवलीतील मागाठाणे परिसरात राहतात. गेल्या तेरा वर्षांपासून ते बिर्ला ग्रुपच्या बिर्ला बॉम्बे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अकाऊंट ब्रॅच प्रमुख म्हणून काम करतात. याच कंपनीची झेनिथ स्टिल पाईप्स अॅण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत मिनल पोटे या संचालक म्हणून काम करतात. या दोन्ही कंपनीचे मुख्य कार्यालय नरिमन पॉईट येथे आहे. 21 सप्टेंबर 2019 ते 25 मे 2022 या कालावधीत त्यांच्या कंपनीत जयप्रकाश सोडानी हे अकाऊंट विभागात वरिष्ठ लेखा अधिकारी म्हणून काम करत होते. कंपनीचे विश्वासू कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कंपनीने अकाऊंट विभागाची संपूर्ण जबाबदारी दिली होती. त्यांच्याकडे कंपनीच्या बँक खात्याचे लॉगिन आयडी, युझर आयडी आणि पासवर्ड होते.
25 मे 2022 रोजी त्यांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. ऑक्टोंबर महिन्यांत बिर्लाशी सर्वच संबंधित कंपनीची एक कॉमन मिटींग झाली होती. त्यात मिलन पोटे यांनी झेनिथ कंपनीचे प्रॉफिट प्रमाण कमी झाल्याचे सांगून कंपनीचे प्रॉफिटबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नमूद केले होते. गेल्या काही वर्षांत कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या कंपनीचे सर्व ऑडिट करण्याचा एक ठराव करण्यात आला होता. त्याची जबाबदारी विपीन वरखावत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी कंपनीचे ऑडिट सुरु केले होते. कंपनीचे सर्व बिले तपासून पाहिल्यानंतर त्यांना कंपनीच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले होते.
बँक स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने एकाच अकाऊंटमध्ये ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्यातील काही खाती जयप्रकाश सोडानी यांचे असल्याचे उघडकीस आले. जयप्रकाशने स्वतसह त्यांची पत्नी कविता माहेश्वरी आणि इतर बँक खात्यात पैसे पाठविले होते. 1 फेब्रुवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत जयप्रकाशने वेगवेगळ्या बँक खात्यात 8 कोटी 69 लाख 93 हजार 046 रुपये ट्रान्स्फर केल्याचे स्टेटमेंटवरुन उघडकीस आले होते. या रक्कमेतून राजस्थानात मोठी प्रॉपटी खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी त्याने 1 कोटी 31 लाख रुपयांचे पेमेंट केले होते. ही प्रॉपटी नंतर त्याने कंपनीच्या नावावर ट्रान्स्फर केली होती. तसेच 17 लाख 90 हजार रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा केले होते.
जयप्रकाशने राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या बँक खात्यातून संबंधित ऑनलाईन व्यवहार केले होते. हा प्रकार उघडकीस येताच जयप्रकाशची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत त्याने कंपनीच्या बँक खात्याच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा दुरुपयोग केल्याची कबुली देताना बँकेत स्वतचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे सर्व व्यवहाराचे मॅसेज कंपनीला न जाता त्याच्या मोबाईल येत होते. जयप्रकाशने राजीनामा दिला असताना कंपनीच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने विपीन वरखावत यांनी समतानगर पोलिसात जयप्रकाश सोडानी, त्याची पत्नी कविता माहेश्वरी आणि इतर बँक खातेदारांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सर्व आरोपीविरुद्ध कंपनीच्या 8 कोटी 69 लाख 93 हजार 046 रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच जयप्रकाश हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना दिड महिन्यानंतर जयप्रकाशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फसवणुकीच्या रक्कमेची जयप्रकाश कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलिसांकडून तपास ुसरु आहे.