अरुण सावरटकर
5 फेब्रुवारी 2026
मुंबई, – अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस अहमदाबाद येथून मालाड पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. दिनेश दानगिरी गोस्वामी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पत्नी अमिता दिनेश गोस्वामी ही सहआरोपी असून तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांनी विविध सोन्याचे दागिने बनविण्यासाठी घेतलेल्या सुमारे दिड कोटीच्या 1338 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
कुणाल नितीन शहा हे व्यावसायिक असून ते सध्या कांदिवलीतील डहाणूकरवाडीत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा रिअल गोल्ड आणि डायमंड ज्वेलरी बनविण्याचा व्यवसाय आहे. मालाडच्या मार्वे रोड, प्रेस्टीज इंडस्ट्रिज इस्टेटमध्ये त्यांच्या पी. एच ऑर्नामेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या कंपनीत ते मुख्य ऑपरेशनल हेड, त्यांची पत्नी पूर्वी शहा, मित्र निलेश ढकाण हे संचालक म्हणून काम पाहतात. त्यांची कंपनी विविध सोन्याचे, हिर्याचे दागिने बनवून त्याची इतर ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करतात. 2018 साली त्यांनी झारा डिजाईन नावाची अन्य एक कंपनी सुरु केली होती. ही कंपनीही विविध ज्वेलर्स व्यापार्यांना सोन्याचे, हिर्यांचे दागिने बनवून त्याची विक्री करते.
2022 साली त्यांच्या कंपनीत ममता नरेंद्र गोस्वामी ही महिला दागिन्यांचे डिजाईन शिकण्यासाठी आली होती. याच दरम्यान त्यांची तिचा पती नरेंद्र गोस्वामीशी ओळख झाली होती. नरेंद्रने तो टायटन कंपनीत कामाला असून त्यांच्या कंपनीसाठी आर्या ज्वेल्स ही कंपनी सोने आणि हिर्यांचे दागिने घडवून देत असल्याची माहिती दिली होती. त्याने त्यांना आर्या ज्वेल्स कंपनीसोबत काम करण्याचा सल्ला दिला, त्यात त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या मालकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.
याच दरम्यान त्यांनी कंपनीचे संचालिका अमिता गोस्वामी आणि महाव्यवस्थापक दिनेश गोस्वामी यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कंपनीचा ट्रक रेकार्ड पाहिले असाता तो चांगला असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत काम सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. जुलै 2022 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत त्यांनी त्यांच्यासोबत अनेक लहान-मोठी सोन्याचे दागिन्यांचे ऑर्डर बनवून घेतले होते. विशेष म्हणजे त्यांनीही वेळेत दागिने परत करुन कंपनीसह त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुणाल शहा यांच्या कंपनीने त्यांच्या कंपनीला ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 2025 या दोन महिन्यांत दिड कोटी रुपयांचे 1338 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते.
मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांना सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. त्यांनी दिनेशसह त्याची पत्नी अमिताला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोघांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात भेट दिली होती, यावेळी त्यांना त्यांची कंपनी बंद असल्याचे दिसून आले. आर्या ज्वेल्स कंपनीचे दिनेश आणि अमिता गोस्वामी हे पती-पत्नी विविध सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या दिड कोटीचे सोने घेऊन पळून गेले होते.
हा प्रकार लक्षात येताच कुणाल शहा यांनी मालाड पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपी पती-पत्नीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच दिनेश हा गुजरातच्या अहमदाबाद शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या पथकाने अहमदाबाद येथून दिनेशला दिड महिन्यानंतर अटक केली.
चौकशीत त्याने त्याच्या पत्नीच्या मदतीने दिड कोटीच्या सोन्याचा अपहार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याची पत्नी अमिता गोस्वामी ही सहआरोपी असून तिला कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. तिचीही लवकरच चौकशी होणार असून या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यावसायिकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.