घर दुरुस्तीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार
इंजिनिअर तरुणींना गंडा घालणारा व्यावसायिक ठगाला अटक
अरुण सावरटकर
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – घर दुरुस्तीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी घेतलेल्या सुमारे सव्वाबारा लाखांचा अपहार करुन एका खाजगी कंपनीच्या इंजिनिअर तरुणीची फसवणुक करुन फरार झालेल्या व्यावसायिक ठगाला अखेर वनराई पोलिसांनी अटक केली. शैलेश जयशंकर शर्मा असे या ठगाचे नाव असून त्याच्या मालकीचे आँरेज इंटेरियर नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने त्याने अनेकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू 50 टक्के सवलतीच्या नावाने देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे बोलले जाते. गुन्हा दाखल होताच तो गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
26 वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या वडिलांसोबत गोरेगाव येथे राहत असून ती एका खाजगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्यांच्या घराचे दुरुस्तीचे काम करायचे असल्याने तिच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीचे काम माटुंगायेथील ऑरेज इंटेरियर कंपनीचे मालक शैलेश शर्मा यांना दिले होते. त्यासाठी त्यांनी त्याला 6 लाख 12 हजार रुपये दिले होते. मात्र पेमेंट करुनही त्याने तीन महिन्यांत पंधरा टक्के काम केले होते. मे 2023 नंतर त्याने काम बंद केले होते. अर्धवट काम ठेवल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबियाला झोपडपट्टीमध्ये भाड्याने राहण्याची वेळ आली होती. काम देण्यापूर्वी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात शैलेशने त्याच्या कंपनीचे एका नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीसोबत भागीदारी असल्याचा दावा करुन त्यांच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक सामान घेतल्यास त्यांना 50 टक्के सवलत मिळेल असे आमिष दाखविले होते.
मार्च 2023 रोजी तिथे भव्य सेल असल्याचे सांगून त्याने त्यांना काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे इच्छा नसताना, त्याने जबदस्तीने केल्यामुळे तिने संबंधित शॉपमध्ये जाऊन मोबाईलसह घरगुती वस्तू, टिव्ही, लॅपटॉप तसेच इतर काही इलेक्ट्रॉथनक वस्तू बुक केले होते. त्यासाठी तिने 6 लाख 16 हजाराचे पेमेंट केले होते. ही रक्कम तिने शॉपच्या नावाने शैलेश शर्माच्या ऑरेज इंटेरियर कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. मात्र दोन महिने उलटूनही तिला तिचे वस्तू मिळाल्या नाही. त्यामुळे तिने शैलेशकडे विचारणा सुरु केली होती, मात्र तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तो तिला कॉल करु नये म्हणून जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. तिच्या घराचे दुरुस्तीचे काम करणार नाही किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू देणार नाही. तिला काय करायचे आहे ते कर असे सांगत होता.
चौकशीदरम्यान शैलेशने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे तिला समजले होते. कंपनी सुरु केल्यानंतर शैलेश संबंधित इलेक्ट्रॉनिक शॉपच्या नावाखाला अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने शैलेश शर्माविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सुमारे सव्वाबारा लाखांचा अपहार करुन फसवणुक करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र तो पळून गेला होता. त्याचा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पोलीस शोध घेत होते. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी वनराई पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शैलेश शर्माने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.