बँकेने जप्ती आणलेल्या प्रॉपटीची खरेदी-विक्री करुन महिलेची फसवणुक
1.53 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक
अरुण सावरटकर
30 मार्च 2026
मुंबई, – कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आलेल्या बोरिवलीसह मालाड परिसरातील रिसोर्ट, फार्महाऊस आणि बंगल्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका महिला व्यावसायिकाची 1 कोटी 53 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. मारिस बेन्नी किन्नी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत चारजण सहआरोपी असून त्यांची नावे संतान मारीस किन्नी, जिको मारीस किन्नी, आयक मारीस किन्नी, स्टेफी मारिओ ग्रोसियास अशी आहे. या कटात मारीस हा मुख्य आरोपी असून त्याला यापूर्वीही फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर आहे. विशेष म्हणजे त्याला जामिन मिळवून देण्यासाठी तक्रारदार महिला व्यावसायिकानेच मदत केली होती.
मेनेका मुरली मेनन ही महिला तिची आई आणि दोन मुलांसोबत अंधेरी येथे राहते. तिचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून या व्यवसायात तिला तिचा मावस भाऊ राकेश रावल हा मदत करतो. डिसेंबर 2022 रोजी तिची मारीस किन्नीसोबत ओळख झाली होती. त्याने त्याची कार विक्रीसाठी काढली होती. ही कार तिने मारीसकडून पंधरा लाखांमध्ये खरेदी केली होती. याच दरम्यान मारीसने तिला त्याच्या मालकीची मालाड आणि बोरिवली परिसरात मोठी प्रॉपटी असल्याचे सांगितले होते. त्यात बोरिवलीतील मनोरा परिसरात 14603 स्के. मीटरचा किन्नी रिसोर्ट आणि फार्महाऊस तर मालाड परिसरात 1850 स्के मीटरचा पॅरेन्टस बंगल्याचा समावेश होता. त्याला ती प्रॉपटी भाड्याने द्यायची होती. त्यामुळे तिने त्याची प्रॉपटी भाड्याने घ्यावे यासाठी त्याचे प्रयत्न होते.
मारीसकडून आलेल्या ऑफरबाबत मेनेका मेननने तिचा भाऊ राकेश रावलशी चर्चा केली होती. यावेळी या दोघांनी त्यांचा किन्नी फार्महाऊस, रिसॉर्ट आणि रिसॉर्टशेजारील बंगला भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. मेनेका मेननच्या घरी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्यात तिन्ही प्रॉपटी 75 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर देण्याबाबत सविस्तर बोलणी झाली होती. मार्च 2023 रोजी महानगरपालिकेने मारिसला रिसोर्ट, बंगल्याची मालमत्ता कर 2016 ते 2022 पर्यंतचा 28 लाख 45 हजार 120 रुपये भरण्याची नोटीस बजाविली होती. ही रक्कम जमा केली नाहीतर त्याची प्रॉपटी जप्त होणार होती. त्यामुळे त्याने मेनेका मेननकडून कराची रक्कम भरण्यासाठी पैसे घेतले होते.
ठरल्याप्रमाणे मेनेका मेननने त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांना हेव्ही डिपॉझिटची रक्कम दिली होती. मात्र पेमेंट करुनही त्याने त्यांना त्याच्या प्रॉपटीचा ताबा दिला नाही किंवा कागदपत्रे तयार केली नाही. त्यामुळे तिने त्याच्याशी सुरु असलेला व्यवहार रद्द करुन तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. त्यानंतर मारीसने तिच्याकडे भाड्याऐवजी संबंधित प्रॉपटीच विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तिन्ही प्रॉपटीसाठी त्याने तिच्याकडे आठ कोटीची मागणी केली होती. त्यापूर्वी त्यांच्यासोबत खरेदी खत तयार करुन देण्याचे आश्वासन दिले होते.
हा प्रस्ताव चांगला वाटल्याने तिने तिन्ही प्रॉपटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच प्रॉपटीसाठी तिने त्याला काही रक्कमेचे पेमेंट केले होते. तरीही प्रॉपटी ताब्यात देण्याबाबत त्याच्याकडून सतत विलंब होत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने प्रॉपटीबाबत चौकशी सुरु केली होती. यावेळी तिला किन्नी कुटुंबियांनी नाशिक मर्चंन्टस सहकारी बँक आणि माळशेज नागरी सहकारी पंतसंस्थेकडून अनुक्रमे किन्नी रिसोर्ट आणि फार्महाऊसवर दोन कोटी तर बंगला तारण ठेवून एक कोटी असे तीन कोटीचे कर्ज घेतल्याचे समजले. त्याचे त्यांच्याकडून नियमित हप्ते भरले जात नव्हते, त्यामुळे बँकेने त्यांच्या तिन्ही प्रॉपटीवर जप्तीची कारवाई केली होती.
याच दरम्यान मारिसविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करर्यात आला होता. त्याचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत मारिस किन्नीला 16 जानेवारी 2024 रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याला जामिनावर बाहेर काढल्यानंतर त्यांच्यातील व्यवहार पूर्ण करुन असे किन्नी कुटुंबियांनी मेनेका मेननला सांगितले. त्यामुळे तिने जामिनासाठी त्यांना ऐंशी लाख रुपये दिले होते. ऐंशी लाखांचे तीन डीडी तिने लोकल कोर्टात जमा केले होते. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर मारिसह इतर आरोपींनी त्यांचा व्यवहार पूर्ण केला नाही. बँकेचे जप्ती केलेल्या प्रॉपटीची लिलाव होणार होती, याबाबत माहिती त्यांनी जाणूनबुजून तिच्यापासून लपवून ठेवली होती.
तिन्ही प्रॉपटीसाठी तिने किन्नी कुटुंबियांना 1 कोटी 53 लाख रुपयांचे पेमेंट केले होते, मात्र त्यांनी प्रॉपटीचा ताबा न देता तिने दिलेल्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने किन्नी कुटुंबियांविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मारीस किन्नी, संतान किन्नी, आयक किन्नी, स्टेफी ग्रोसियास आणि जिको किन्नी अशा पाचजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत तीन दिवसांपूर्वी मारीस किन्नीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत इतर चौघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.