फसवणुकीच्या गुन्ह्यांत रणजी खेळांडूनसह तिघांना अटक
डिजीटल अरेस्टची भीती दाखवून 32 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप
अरुण सावरटकर
6 एप्रिल 2026
मुंबई, – पुलवामा हल्ल्यातील दशहतवादी अफजल खान याच्या देशविघातक कृत्यांना मदतीसह गोपनीय माहिती लिक केल्याचा आरोप करुन एका तरुणीासह तिच्या वयोवृद्ध आजीला डिजीटल अरेस्टची धमकी देऊन सुमारे 32 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याच्या कटातील तीन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. ऋषी तुषार आरोटे, हर्ष दिलीप पांचाळ आणि निखिल केशवराम तिवारी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गुजरातच्या वडोदराचे रहिवाशी आहेत. यातील ऋषी हा अंडर 19 रणजी खेळाडू असून त्याचे वडिल क्रिकेट कोच आहेत. ऋषीसह इतर दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप त्याच्याविरुद्ध मुंबईसह गोवा, बंगलोर आणि गुजरात राज्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. झटपट श्रीमंतीसाठी त्याने क्रिकेट सोडून हा शॉटकट मार्ग घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत नांदेडचे रहिवाशी असलेले निलेश प्रभाकर वासमवार, शुभम संजय जोगंड, अजय देवीदासराव ओसद्रे आणि सिद्धांत दिलीप जोधळे या चौघांना पोलिसांनी अटक केली होती.
मैत्रेई विद्यासागर ही 21 वर्षांची तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत गोरेगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत आर्टिस्ट म्हणून काम करते. 11 फेब्रुवारीला तिच्या आजीच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. तामिळमध्ये बोलणार्या या व्यक्तीने तो चेन्नई पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगून मुंबई पोलिसांनी पहलगाम हल्ल्यातील एक आरोपी अफजल खान याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक सिमकार्ड जप्त केले असून त्या सिमकार्डवरुन देशाची अत्यंत गोपनीय माहिती शेअर करण्यात आली आहे. सिमकार्ड तिच्या आजीच्या नावाने घेण्यात आले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच माहीम येथून त्यांचा डाटा लिक झाला असून त्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांना त्यांच्याकडून नॉन इन्व्हॉलमेंट सर्टिफिकेट घ्यावे लागेल असे सांगितले.
त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप असलयाने त्यांनी चौकशीला सहकार्य करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बाब कोणालाही सांगू नका. व्हिडीओ कॉलद्वारे त्याने त्यांना अफजल खान हा त्याच्या ताब्यात असून त्याला पोलीस बेदम मारहाण करत आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला. ते पाहून ती प्रचंड घाबरली होती. त्याने तिला तिच्या आजीवर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे असे सांगून तिला या गुन्ह्यांत 90 दिवस कोठडी मिळणार आहे. याच दरम्यान त्याने त्यांच्या आर्थिक व्यवहारासह बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई एटीएस, आरबीआय, दिल्ली एनआयए, चिफ जस्टीस ऑफ इंडियासारख्या शासकीय संस्थाचा वापर करुन अधिकार्यांच्या नावाने सही आणि कार्यालयीन लोगोचा वापर करुन बोगस एफआयआर, अरेस्ट वॉरंट, गोपीनियतीचे बंधपत्र आदी बोगस दस्तावेज पाठवून तिच्या मनात भीती निर्माण करण्यात आली होती.
तिला काही बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यात काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. या आर्थिक व्यवहाराची चौकशी होईल, चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांचे सर्व पैसे बँक खात्यात पाठविण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे तिने त्याने दिलेल्या बँक खात्यात 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत टप्याटप्याने 32 लाख 69 हजार 997 रुपये ट्रान्स्फर केले होतै. ही रक्कम पाठवूनही ते तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने उत्तर सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही दिवसांत प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर, पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे व त्यांच्या टिमने नांदेड येथून निलेश वासमवार, शुभम जोगंड, अजय ओसद्रे आणि सिद्धांत जोंधळे या चौघांना नांदेड येथून अटक केली होती. सध्या ते चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांच्यासह इतर काही आरोपींना सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती.
झटपट श्रीमंतीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविली
ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांत वडोदरा शहरात राहणार्या काही तरुणांचे नावे समोर आली होती. त्यानंतर या पथकाने वडोदरा येथून ऋषी आरोटे, हर्ष पांचाळ आणि निखील तिवारी या तिघांना अटक केली. चौकशीत ते तिघेही वडोदरा येथील नव्रचना युनिव्हरसिटी, मिलेनियम अपार्टमेंटमध्ये राहतात. यातील ऋषी हा क्रिकेटर असून त्याने अंडर 19 रणजीमध्ये अनेक सामने खेळले आहे. लेफ्ट हॅण्ड बॅट्समन आणि लेफ्ट आर्म्स मिडियम पेस बॉलर असलेल्या ऋषीचे वडिल क्रिकेट कोच आहेत. त्याची एक खाजगी कंपनी असून या कंपनीत तो संचालक म्हणून काम पाहत होता. गुंतवणुकीच्या नावाने गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध मांजलपूर आणि रावपुरा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दखल झाले होते.
याच गुन्ह्यांत मार्च 2024 साली त्याला ठाण्यातील एका हॉटेलमधून गुजरात पोलिसांनी अटक केली होती. क्रिकेट क्लब सुरु करण्याचा तसेच इंडियन प्रिमिअर लिगमध्ये उदयोन्मुख खेळांडूंना प्रशिक्षण शिबीरात स्थान देण्याची बतावणी करुन ऋषीसह इतरांनी लाखो रुपयांना गंडा घातला होता. त्याच्या घरावर केलेल्या कारवाईत एक कोटीची कॅश जप्त केली होती. ही रक्कम त्याने नाशिकच्या एका अंगाडियाकडून घेतली होती. झटपट श्रीमंत होण्यासाठी तो काही सायबर ठगांच्या संपर्कात आला होता.
फसवणुकीसाठी त्याने या ठगांना विविध बँकेचे खाती पुरविले होते. त्यासाठी त्याने बोगस कंपन्यांच्या नावाने खाती उघडले होते. याकामी त्याला हर्ष पांचाळ आणि निखील तिवारी यांनी मदत केली होती. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना पुरविल्यानंतर त्यात ऑनलाईन फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची जमा झाली होती. त्यासाठी त्याला लाखो रुपये कमिशन म्हणून मिळाले होते. ऋषिविरुद्ध उत्तर-दक्षिण सायबर सेलमध्ये अनेक फसणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचा ताबा लवकरच दक्षिण मुंबई सायबर सेलकडून घेतला जाणार आहे.
तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांनाही गुजरात येथून मुंबईत पुढील कारवासाठी आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर ऋषीसह तिघांना सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करणयत आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ऋषीविरुद्ध मुंबईसह गोवा, बंगलोर आणि गुजरात राज्यात अनेक फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.