गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने 35 लाखांना गंडा

सायबर ठगांना मदत करणार्‍या तिघांना अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
12 एप्रिल 2026
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे गाजर दाखवून एका कन्सलटन्सी व्यावसायिकाला 35 लाखांना गंडा घालणार्‍या तिघांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. तेजस देवीदास गायकवाड, दिपक जयसिंग चौधरी आणि राहुल तुकाराम मेमाणे अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी या गुन्ह्यांतील सायबर ठगांच्या संपर्कात होते, त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

53 वर्षांचे तक्रारदार संजय रुपचंद गुप्ता हे गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, सेटेलाईट टॉवर अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा कन्सलटन्सीचा व्यवसाय असून त्यांचे एका खाजगी बँकेत खाते आहे. 6 फेब्रुवारीला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने स्टॉप वर्ल्ड एफ 10 या ग्रुपमध्ये अ‍ॅड केले होते. संबंधित ग्रुप गुंतवणुक कन्सलंट असून त्यात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळतो अशी जाहिरात करण्यात आली होती. याच ग्रुपमध्ये साची मिना ही पैशांची देवाणघेवाण पाहत होती तर डॉ. राजीव सिंग हे ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. साचीने त्यांना त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा सल्ला दिला होता, या गुंतवणुकीवर त्यांना हमखास चांगला फायदा होईल असे आश्वासन देऊन तिने त्यांना एक लिंक शेअर केली होती.

ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांचे एक प्रोफाईल तयार करण्यात आले होते. त्यानंतर गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांनीही कुठलीही शहानिशा न करता कंपनीच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी ते 20 मार्च 2026 या कालावधीत 35 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा झाल्याचे दिसनू आले होते. मात्र त्यांना ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. प्रोसेसिंगच्या नावाने त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली जात होती. 40 लाख रुपये भरल्यानंतर त्यांची मूळ रक्कमेसह प्रॉफिटची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगण्यात आले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच संजय गुप्ता यांनी उत्तर सायबर सेल विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर संबंधित सायबर ठगासह त्यांच्या इतर सहकार्‍याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून तेजस गायकवाड, दिपक चौधरी आणि राहुल मेमाणे या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात ते तिघेही गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असलेल्या सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती ओपन केले होते. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर फसवणुकीची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती.

फसवणुकीसाठी बँक खाती दिल्याने त्यांना फसवणुकीच्या रक्कमेची काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाली आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page