नवीन व्यवसायाच्या नावाने व्यावसायिक पती-पत्नीची फसवणुक
63 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पार्टनरला अटक व कोठडी
अरुण सावरटकर
15 जून 2025
मुंबई, – नवीन व्यवसाय सुरु करण्याची बतावणी करुन एका व्यावसायिक पती-पत्नीची सुमारे 63 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी पार्टनरला अखेर बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. आनंदकुमार चंद्रशेखर सिंग असे या 32 वर्षीय पार्टनरचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याच्यासोबत सुषमा आनंदकुमार सिंग, हर्ष आनंदकुमार सिंग आणि यश आनंदकुमार सिंग असे तीनजण सहआरोपी असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिंग कुटुंबियांनी त्यांच्या कंपनीच्या नावासह लोगोचा गैरवापर करुन स्वतची कंपनी सुरु करुन ग्राहकांशी आर्थिक व्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
निता विनोद शर्मा ही महिला सांताक्रुज येथे राहत असून तिचा पूजेचे साहित्य विक्रीचा तर तिचे पती विनोद राममिलन शर्मा यांचा सिव्हील कॉन्ट्रक्टरचा व्यवसाय आहे. तिच्या पतीचा आनंदकुमार सिंग हा परिचित असून तो गोरेगाव परिसरात राहतो. त्याने त्याला स्वतचा व्यवसाय सुरु करायचे आहे असे सांगून त्यांना पूजेचे साहित्य विक्रीचा पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला होता. त्यास विनोद शर्मा यांनी होकार दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी गेट सेट गो नावाची एक कंपनी सुरु केली होती. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात व्यवसायात पन्नास टक्के गुंतवणुक करुन होणारा नफा आणि नुकसानीवर पन्नास टक्के भागीदारीवर करार वकिलाकडे नोटरी करुन पाठविण्यात आले होते.
सुरुवातीला आनंदकुमार सिंग याच्या घरातून हा व्यवसाय सुरु करणयात आला. ऑर्डरप्रमाणे पूजेचे साहित्य संबंधित ठिकाणी डिलीव्हरी केली जात होती. त्याचे पेमेंट कंपनीच्या नव्याने उघडण्यात आलेल्या बॅक खात्यात जमा होत होता. 2021 पर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरु होता. मात्र नंतर निता आणि विनोद शर्मा यांना आनंदकुमारने स्वतंत्र दुसर्या कंपन्या उघडून स्वतचा वेगळा व्यवसाय सुरु केल्याची माहिती समजली होती. या कंपनीच्या माध्यमातून तो त्यांच्या कंपनीच्या प्रोडेक्ट विक्री करत होता. त्यामुळे त्यांच्या कंपनीतून माल घेणारे ग्राहक नंतर आनंदकुमारच्या कंपनीशी माल खरेदी करत होते. इतकेच नव्हे तर आरोपी आनंदकुमारने स्वतच्या कंपनीसाठी त्यांच्या कंपनीच्या पैशांचा वापर सुरु केला होता.
ग्राहकांना दिलेल्या बिलांमध्ये त्यांच्या कंपनीचा लोगोचा उल्लेख होता. अशा प्रकारे आनंदकुमार, सुषमा सिंग, हर्ष सिंग आणि यश सिंग यांनी त्यांच्या कंपनीच्या मालाची स्वतच्या कंपनीच्या नावे विक्री करुन मिळालेले पेमेंट त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा केला होता. गेल्या काही वर्षांत सिंग कुटुंबियांनी कंपनीसह निता शर्मा आणि विनोद शर्मा यांची 63 लाख 31 हजार 738 रुपयांची आर्थिक फसवणुक केली होती. हा संपूर्ण व्यवहार 14 ऑक्टोंबर 2019 ते 8 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत झाला होता. याच कालावधीत त्यांनी 38 बँक ट्रान्झॅक्शनद्वारे त्यांचया कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यातील पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी आनंदकुमारकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने स्वतचा व्यवसाय सुरु केल्याचे मान्य करुन त्यांच्या कंपनीचा गैरवापर करुन अनेक ग्राहकांना परस्पर मालाची डिलीव्हरी तसेच पेमेंटचा अपहार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने त्यांना धमकीच देऊन तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे सांगितले होते. हा प्रकार उघडकीस येताच निता सिंग हिने सिंग कुटुंबियांविरोधात बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर आनंदकुमार सिंग, त्याची पत्नी सुषमा सिंग, दोन मुले हर्ष आणि यश शर्मा यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. याच गुन्ह्यांत दिड महिन्यानंतर आनंदकुमार सिंग याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.