१.३७ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाला अटक
क्रेडिटवर घेतलेल्या ल्युबिकंट ऑईलच्या पेमेंटचा अपहार केल्याचा आरोप
अरुण सावरटकर
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या कासी सुरेश ऊर्फ सुरेश के या व्यावसायिकाला अखेर विमानतळ पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर कासी सुरेशला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रेडिटवर घेतलेल्या १ कोटी ३७ लाख रुपयांच्या ल्युबिकंट ऑईलच्या पेमेंटचा अपहार करुन गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याची पार्टनर प्रिया नाडार हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. दोन्ही आरोपी व्यावसायिक मूळचे तामिळनाडूच्या चेन्नईचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहिसरचे रहिवाशी असलेले दिनेश गणपती परांजपे (६२) हे व्यावसायिक असून त्यांची सॅलनिक सोल्युशन्स नावाची एक कंपनी आहे. गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाल्मसमध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या कंपनीकडून औद्योगिक सामग्री आणि मेन्टेनन्स कॉन्ट्रक्टची काम केली जातात. ऑक्टोंबर २०२२ रोजी ओएनजीसीचे निवृत्त अधिकारी सुनिल तरेजा यांनी त्यांना प्रिया नाडार या महिलेविषयी माहिती दिली होती. तिची चेन्नईा एमएसपी इंटरप्रायेजेस नावाची एक कंपनी असून तिच्या कंपनीला मोठ्या प्रमाणात औद्योगिक ल्युबिकंट ऑईलची आवश्यकता असते. त्यामुळे ती त्यांच्या कंपनीला दरमाह चारशे ते पाचशे बॅरलची ऑर्डर देईल. तुम्हाला एक चांगली व्यावसायिक संधी असल्याने या संधीचा फायदा घ्या असा सल्ला दिला होता. त्यास त्यांनी होकार देत त्यांची सांताक्रुजच्या ताज हॉटेलमध्ये एक मिटींग ठरविली होती. काही दिवसांनी त्यांची प्रिया नाडारशी भेट झाली होती. या भेटीदरम्यान तिने तिच्या कंपनीसह तिच्या कामाविषयी माहिती सांगितली.
याच बैठकीत त्यांच्यात ल्युबिकंट ऑईल सप्लायबाबत सर्व अटी आणि शर्तीबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्यात एक एमओयू बनविण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी तिला एकूण तीन सॅम्पल पाठविले होते. त्यापैकी एका सॅम्पलची निवड करुन तिने त्याचे ८४ हजार लिटर म्हणजेच ४०० बॅरलची ऑर्डर दिली होती. विश्वास बसावा म्हणून तिने त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यामुळे त्यांचा तिच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर त्यांनी तिला १ कोटी ६४ लाख ५३ हजार ९२० रुपयांच्या ४०० बॅरेक ल्युबिकंट ऑईलची डिलीव्हरी केली होती. डिलीव्हरीनंतर कंपनीने ते ऑईल स्विकारल्याचे टॅक्स इन्व्हाईस, ई-वे बिल, डिलीव्हरी चलन प्रत्येकी प्रती दिल्या. या ऑईलचे २५ लाख रुपये तिने आधी दिले होते. उर्वरित १ कोटी ३७ लाख ५३ हजार ९२० रुपयांचे पेमेंट दहा दिवसांत देण्याचे तिने आश्वासन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही तिने पेमेंट केले नाही. मार्च २०२३ नंतर तिने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे मालक कासी सुरेशकडे विचारणा सुरु केलीे होती.
मात्र त्याच्याकडूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीची माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना ती कंपनी कासी सुरेशच्या नावावर रजिस्ट्रर असून त्यांच्या दोन स्वतंत्र कंपन्या आहेत. वारंवार विचारणा करुनही पेमेंट मिळत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रिया नाडार आणि कासी सुरेश यांना नोटीस पाठविली होती, मात्र त्यांनी ती नोटीस स्विकारली नाही. २५ लाखांचे पेमेंट करुन या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून घेतलेल्या ल्युबिकंट ऑईलच्या उर्वरित पेमेंटचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर कासी सुरेश आणि प्रिया नाडार यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवुणकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच विमानतळ पोलिसांची एक टिम चेन्नईला गेली होती. या टिमने फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेल्या कासी सुरेशला अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.