सुरतच्या हिरे दलालाची एक कोटीच्या फसवणुकीप्रकरणी त्रिकुटास अटक
कॅश गुंतवणुकीवर चांगला परवाता देण्याच्या आमिषाने गंडा घातला
राजू परुळेकर
मुंबई, – कॅश स्वरुपात गुंतवणुक केलेल्या पैशांवर चांगला परतावा देतो असे सांगून सुरतच्या हिरे दलालाची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका त्रिकुटाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. रेहान इक्बाल शेख ऊर्फ समीर चौधरी, सौरभ राजेश दुबे आणि विनय श्रवणकुमार मेहता अशी या तिघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत अमन भोला सिंग ऊर्फ संजय, मणिकंडल, संदेश काळे, हरिअण्णा या चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. लवकरच या गुन्ह्यांत चारही आरोपींना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सागितले.
मनिष प्रविणभाई पटेल हे गुजरातच्या सुरतचे रहिवाशी असून त्यांचा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा दलालीचा व्यवसाय आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते मुंबईत राहत असताना बॉलीवूड इंडस्ट्रियजशी संबंधित होते. त्यात त्यांना प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे ते काम सोडल्यानंतर त्यांनी हिर्याच्या दलालीचे काम सुरु केला होता. यावेळी अभिषेक भगवानदास अग्रवाल याच्याशी त्यांची मैत्री झाले होते. ते दोघेही एकत्र असल्याने त्यांचा अभिषेकवर प्रचंड विश्वास होता. फिल्मलाईनची नोकरी सोडल्यानंतर अभिषेक त्यांना हिर्याच्या दलालीच्या व्यवसायात मदत करत होता. त्यांचा बहुतांश व्यवहार कॅश स्वरुपात चालत असल्याची त्याला माहिती दिली.
मार्च २०२३ रोजी त्यांना अभिषेककडून मालाड येथे काही फायनाशियन कंपन्या आहेत, या कंपनीत कॅश स्वरुपात पैसे दिल्यानंतर ट्रेडिंग प्राफिट फंडच्या माध्यमातून आरटीजीएसद्वारे ही कंपनीत अधिक परतावा देत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे या दोघांनी गोरेगाव येथील व्ही. बी इंटरनॅशनल या अंगाडिया कंपनीच्या कार्यालयात भेट दिली होती. तिथे त्यांना एक कोटी रुपये कॅश स्वरुपात जमा केल्यास सायंकाळपर्यंत त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे दिड कोटी रुपये जमा होतील असे सांगणयात आले. मात्र या गोष्टींवर त्यांचा विश्वास नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी अभिषेकने एकदा पैसे गुंतवणुक करण्यास काय हरकत आहे असे सांगून त्यांना एक कोटी रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचित लोकांकडून काही पैसे उसने घेतले होते.
ऑगस्ट २०२३ रोजी एक कोटी रुपये जमा होताच अभिषेकने त्यांना संदेश काळे याच्याशी ओळख करुन दिली. तो ग्राहक आणि कंपनीमध्ये मध्यस्थीचे काम करतो. त्याच्या मदतीने आपण गुंतवणुक करु असे सांगितले. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी ते दोघेही विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये गेले होते. तिथे संदेशने त्यांची ओळख समीर चौधरी आणि संजय सिंगशी करुन दिली. या तिघांनी एक कोटीच्या मोबदल्यात त्यांना काही तासांत एक कोटी दहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले होते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगून त्यांना मालाड येथील पी. एम अंगाडिया कंपनीच्या कार्यालयात बोलाविले होते. तिथे पैसे जमा केल्यानंतर त्यांना एक पावती मिळेल. परताव्यासह मुद्दल रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर ती पावती पुन्हा कार्यालयात जमा करावी लागेल असे सांगितले.
ठरल्याप्रमाणे मार्च महिन्यांत संदेश त्यांना पी. एम अंगाडियाकडे न नेता तिरुपती लॉजिस्टिक अंगाडिया कार्यालयात घेऊन आला. तिथे समीर आणि संजय हे दोघेही उपस्थित होते. ही रक्कम त्यांच्या समक्ष कार्यालयातील कर्मचारी मणिकंडल याच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर त्याने त्यांना एक कोटी रुपये घेतल्याची पावती दिली होती. त्यात त्यांच्या नावासह अंगाडिया आणि टोकन क्रमांक होता. यावेळी त्यांनी दिड तासांत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली नाहीतर एक कोटी रुपये परत केले जातील असे सांगितले. त्यानंतर तिथे एक तरुण आला आणि तो एक कोटी रुपयांची कॅश घेऊन निघून गेला. मात्र दिड तासांत त्यांच्या बँक खात्यात मुळ रक्कमेसह परवाव्याची रक्कम जमा झाली नव्हती. त्यामुळे समीर आणि संजयने येत्या दोन दिवसांत ही रक्कम जमा होईल असे सांगून तेथून पलायन केले.
मात्र दोन दिवस उलटूनही ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे मनिष पटेल यांनी त्यांच्याकडे एक कोटीची मागणी सुरु केली होती. ते संबंधित कार्यालयात गेले, यावेळी तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांनी संदेशसह समीर आणि संजयला फोन केला. मात्र त्यांना कोणीच प्रतिसाद देत नव्हते. काही वेळानंतर त्यांना समीरचा फोन आला. त्याच्यासह त्यांच्या कंपनीत सायबर क्राईम पोलिसांकडून नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांचे बँक खाते पोलिसांनी फ्रिज केले आहे. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना बोगस नोटीसची एक प्रत दाखवली होती. तुमचे पैसे परत मिळतील असे सांगून त्यांनी त्यांना पाठवून दिले होते. त्यानंतर ते सतत त्यांच्या संपर्कात होते.
याच दरम्यान त्यांना दिडोंशी पोलिसांचा फोन आला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यांत समीर चौधरी, सौरभ दुबे आणि विनय मेहता या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर ते दिडोंशी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या सर्व आरोपीविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे, बोगस दस्तावेज बनविणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशीत फसवणुक करणारी एक सराईत टोळी असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत. त्यांच्या अटकेने अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.