माजी मंत्री नवाव मलिकच्या नावाने वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणुक
डिजीटल अरेस्टच्या नावाने गंडा घालणार्या आरोपीस अटक
अरुण सावरटकर
25 एपिल 2025
मुंबई, – माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहआरोपी असल्याची बतावणी करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाला डिजीटल अरेस्टची धमकी देऊन दहा लाखांना गंडा घातल्याप्रकरणी वॉण्टेड सायबर आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. जैद अली सादीक खान असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीची रक्कम जैदच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम नंतर त्याने सायबर ठगांना दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीसह त्याच्यासह इतर आरोपींना सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून अशा प्रकारे बॅक खाती पुरविणारी ही टोळी असल्याचे बोलले जाते. या टोळीतील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नरेश गोरधनदास परमार हे 70 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कांदिवली परिसरात राहतात. त्यांचा पुनित पेपर प्रोडक्टचा व्यवसाय आहे. 16 जानेवारी 2025 रोजी त्यांना गोपेशकुमार नाव सांगणार्या एका व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आला होता. त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात ाअले असून त्यात मनी लॉड्रिंगच्या कमिशनची वीस लाखांची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात मोहम्मद नवाब मलिक, धीरज प्रसाद साहू, राजबीर सिंग आणि यश यांनी पाठविले असून या चौघांनाही मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या खटल्याची सुनावणी दिल्ली कोर्टात सुरु आहे. त्यांच्या आधारकार्डची डिटेल्स काढल्यानंतर त्यांच्या नावाने विविध बँकेत खाती उघडण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगून त्यांच्याकडे त्यांच्या प्रॉपटीसह बँक खात्याबाबत माहिती विचारण्यात आली. त्यांच्या बँकेत किती रुपये आहेत, त्यांनी किती रुपयांचे एफडी केले आहेत, त्यांनी शेअरमार्केटसह म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आली होती.
ही सर्व माहिती द्या नाहीतर त्यांचे सर्व बँक खाते फ्रिज केले जाईल अशी धमकी दिली होती. काही वेळानंतर त्यांच्याशी राजवीर कुमार नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने त्यांना चौकशीला मदत करा. कॉल बंद करु नका असे सांगून त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगितले. त्यांना त्यांच्या रुमच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. चौकशी सुरु असेपर्यंत त्यांना कोणालाही संपर्क साधता येणार नाही. त्यांच्या संरक्षणासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस तैनात करण्यात आले. तुम्हाला काही अडचणी आल्यास आम्हाला सांगा असे सांगतले. त्यामुळे घाबरुन नरेश परमार यांनी व्हिडीओ कॉल सुरु ठेवला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याची चौकशी करायची असल्याने त्यांना एका बँक खात्याची डिटेल्स पाठविण्यात आली. त्यात त्यांना त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. चौकशी पूर्ण होताच त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम परत केली जाईल असे सांगितले. त्यांनी तसे न केल्यास बाहेर उभे असलेले पोलीस त्यांना अटक करुन दिल्लीत चौकशीसाठी आणतील अशी पुन्हा धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी अटकेच्या भीतीने त्यांना दहा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर राजवीरने त्यांना या संपूर्ण पैशांची चौकशी सुरु आहे.
या चौकशीत त्यांचा मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यास त्यांना अटक करु नाहीतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही तसेच त्यांची रक्कम त्यांना त्यांच्या खात्यात पाठविली जाईल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांचा कॉल बंद केला. नंतर त्यापैकी कोणीही त्यांना कॉल केला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पैशाविषयी विचारणा करण्याासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार कॉल करुनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन, सायबर सेल आणि कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तोतयागिरी करुन अपहारासह फसवणुक, खंडणी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची डिटेल्स काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील काही रक्कम जैद खान याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम ट्रान्स्फर होताच ती रक्कम काढण्यात आली होती.
तपासात ही बाब उघडकीस येताच वॉण्टेड असलेल्या जैदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुक करणार्या काही सायबर ठगांना जैद हा संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने बँकेत खाती उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना दिली होती. त्यानंतर या बँक खात्याचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी होत होता. तपासात ही बाब उघडकीस येताच जैदला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. ही टोळी सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडण्यास मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.