शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने गंडा घालणार्या चौकडीला अटक
सायबर ठगांच्या संपर्कात राहून बँक खाती पुरविल्याचा आरोप
अरुण सावरटकर
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका इस्त्री व्यावसायिकाला सुमारे 22 लाखांना गंडा घालणार्या चारजणांच्या एका टोळीला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सचिन बोडके, आकश गणपन डोंगरे, सचिन हनुमान लोभे आणि भरत कृष्णराज यादव अशी या चौघांची नावे आहेत. ते चौघेही या कटातील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात असून त्यांच्याच सांगण्यासाठी त्यांनी फसवणुकीसाठी विविध बँकेत खाती उघडून दिल्याचा आरोप आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुरेंद्र मनोहरलाल कनोजिया हे अंधेरीतील न्यू डी. एन नगर, न्यू संगम सोसायटीमध्ये राहत असून त्यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत त्यांना रिया नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिने ती निफ्टी स्टॉक कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ही कंपनीत शेअरमार्केटशी संबंधित आहे. कंपनीत त्यांच्या सभासदांचे पैसे शेअरमध्ये गुंतवणुक करत असून या गुंतवणुकींना त्यांना चांगला परतावा मिळतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने त्यांचे झिरोदा खाते उघडण्यासाठी माहिती घेतली होती. ते खाते उघडून तिने त्यांच्या नावाने ट्रेडिंग सुरु केले होते. त्यात त्यांना चांगला फायदा झाला होता. या फायद्याबाबत तिने त्यांच्याकडून आधी सहा आणि नंतर साडेसात हजार रुपये फी घेतली होती.
काही दिवसांनी त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले होते. यावेळी रियाचा सहकारी विजयने त्यांना कॉल करुन ते नुकसान भरुन काढण्यासाठी अन्य एका स्किमची माहिती दिली होती. त्यात त्यांनी प्रति दिन एक लाख रुपये जमा केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना शेअर ट्रेडिंगसाठी साडेपाच लाख ट्रान्स्फर केले होते. यावेळी विजय आणि रिया यांच्याकडे त्यांच्या झिरोदा खात्याचे युझरनेम, पासवर्ड आणि अॅप कोड मागून घेतल्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्या खात्याचा अॅक्सेस होता. मात्र या गुंतवणुकीवर त्यांना फायदा न होता नुकसान झाले होते. ते नुकसान भरुन काढण्यासाठी ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून पैसे जमा करण्यास सांगत होते. त्यांना वेगवेगळे शेअरचे स्किम सांगून सर्व नुकसान भरुन काढण्याचे आश्वासन देत होते.
त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी 18 ऑगस्ट ते 30 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत शेअर ट्रेडिंगसाठी त्यांना 22 लाख 70 हजार 740 रुपये दिले होते. मात्र मूळ रक्कमेसह कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती. शेअर ट्रेडिंगच्या नावाने फसवणुक होत असल्याचे लक्षात त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी रिया, विजय आणि रोहन नाव सांगणार्या तीन सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीवरुन तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सचिन बोडके, आकाश डोंगरे, सचिन लोभे आणि भरत यादव या चौघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत चौघेही या कटातील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीसाठी त्यांनी सायबर ठगांना विविध बँकेतील खाती पुरविले होते.
याच बँक खात्यात सुरेश कनोजिया यांच्याकडून ट्रान्स्फर झालेली रक्कम जमा झाली होती. ही रक्कम नंतर त्यांनी सायबर ठगांना पाठविली होती. याकामी त्यांना काही ठराविक रक्कमेचे कमिशन प्राप्त झाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.