कारवाईची धमकी देत गुन्हा रद्द करण्यासाठी ८० लाखांची मागणी
वकिल तरुणीच्या तक्रारीवरुन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
राजू परुळेकर
२६ मार्च २०२४
मुंबई, — इराण येथे पाठविण्यात येणार्या पार्सलमध्ये ड्रग्जसह इतर आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचा दावा करुन एका वकिल तरुणीला कारवाईची धमकी देत तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी अज्ञात सायबर ठगाने चक्क ८० लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
३० वर्षांची तक्रारदार तरुणी ही वकिल असून ती तिच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथे राहते. सोमवारी रंगपंचमीनिमित्त कोर्टाला सुट्टी होती, त्यामुळे ती तिच्या घरी होती. दुपारी दिड वाजता तिला एका अज्ञात मोबाईलवरुन एक कॉल आला होता. समोरील व्यक्तीने तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असून त्याने तिच्या नावाने इराण येथे राहणार्या अरमान मलिक नावाच्या व्यक्तीला पाठविण्यासाठी एक पार्सल आहे. या पार्सलमध्ये कपडे, पाच मुदत संपलेले पासवर्ड, तीन क्रेडिट कार्ड, एसबीआयचे डेबीट कार्ड आणि ५० एलएसडी स्टीप्स असल्याचे सांगितले. ते पार्सल मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे. तिने अरमान मलिकला ती ओळखत नसून त्याला तिने कुठलेही पार्सल पाठविले नाही. यावेळी या व्यक्तीने तिचा कॉल सायबर सेल मुख्यालयात ट्रान्स्फर करतो असे सांगून एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याशी तिचे बोलणे करुन दिले होते. या तोतया पोलीस अधिकार्याने तिला स्काईप ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामुळे तिने तिच्या मोबाईलवरुन ते ऍप डाऊनलोड केले होते. यावेळी त्या अधिकार्याने त्याचे आयडी कार्ड पाठवून तिला तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध कारवाई होणार असल्याचे सांगितले. हा गुन्हा रद्द करायचा असेल तर तिचे वैयक्तिक ओळखपत्र म्हणजे पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक खात्याचे डिटेल्स आणि फोटो पाठविण्यास सांगितले. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. थोड्या वेळासाठी ती प्रचंड घाबरली होती. हा काय प्रकार आहे तेच तिला समजत नव्हते. त्यामुळे तिने तोतया पोलिसाला तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स पाठवून दिली होती. काही वेळानंतर त्याने तिला एक कराराची प्रत पाठवून ती माहिती कोणालाही शेअर करु नकोस असे सांगितले.
दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी २६ मार्चला त्याने तिला पुन्हा फोन करुन तिच्या बँक खात्यातून ते सांगतील त्या बँक खात्यात ८० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. अज्ञात व्यक्तीनी तिच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा करुन तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिच्याकडे तब्बल ८० लाखांची मागणी करुन तिची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचार्यासह तोतया पोलीस अधिकार्याविरुद्ध १७०, ४१९, ४२०, ५११ भादवी सहकलम ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून अशा धमक्यांना बळी न पडता संबंधितांनी पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.