22 कोटी 75 लाखाच्या हिर्‍यांचा अपहारप्रकरणी तिघांना अटक

तिघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड

0

राजू परुळेकर
6 मे 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या 22 कोटी 75 लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्‍याची फसवणुक करुन पळून गेलेल्या तीन आरोपींना मुंबईसह सातारा आणि राजस्थान येथून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तिन्ही आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हेमंत भाईलाल शहा ऊर्फ हिमांशू शहा, कौशल दिलीप कदम ऊर्फ आशिष माने आणि शकील अहमद मोहम्मद मेहमूद शेख ऊर्फ समीर संघानी अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांकडून अपहार केलेले सर्व हिरे लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

यातील तक्रारदार शहरातील एक नामांकित हिरे व्यापारी असून त्यांच्या मालकीची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनीत देश-विदेशात हिरे खरेदी-विक्री करते. वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय असून याच कार्यालयातून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. हिरेसहीत हिरेजडीत दागिन्यांची विक्री आणि व्यवसाय वाढीसाठी त्यांनी गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये भाग घतला होता. यावेळ काही ग्राहकांसह हिरे दलालांनी हिर्‍यासह दागिन्यांची विचारणा करुन त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला होता. मे 2022 रोजी त्यांना हिमांशू शहा आणि समीर संघानी नाव सांगणार्‍या दोन व्यक्तींनी फोन केला होता. त्यांनी त्यांचा वांद्रे येथे हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्यासोबत हिर्‍यांचा व्यवसाय सुरु करण्याबाबत विचारणा केली होती.

जून 2022 रोजी ते दोघेही त्यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी या दोघांनी त्यांच्या संपर्कात विदेशातील काही हिरे व्यापारी असून त्यांना हिरे विक्री करुन त्यांना फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना क्रेडिटवर काही हिरे दिले होते. 90 दिवसांच्या क्रेडिटवर घेतलेल्या हिर्‍यांचे पेमेंट आधीच करुन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सात महिन्यांत तक्रारदारांनी त्यांना 42 वेळा 24 कोटीचे हिरे दिले होते. या हिर्‍यांच्या विक्रीतून आलेली सव्वाकोटीचे पेमेंट त्यांनी त्यांना परत केले होते. मात्र उर्वरित 22 कोटी 75 हजार 31 हजार रुपयांचे पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्यांनी जानेवारी 2023 पासून त्यांना हिरे देणे बंद केले होते.

मे 2023 रोजी ते त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना त्यांचे कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. ते दोघेही मोबाईल बंद करुन पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी खार पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशांनतर सहपोलीस आयुक्त निशित मिश्र, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड, पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दरेकर, राजेंद्र तावडे, पोलीस हवालदार मंदार राणे, पोलीस शिपाई जयेश अत्तरदे, अभिषेक प्रभू यांनी तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन हिमांशू शहा याला विलेपार्ले येथील अग्रवाल मार्केट, आशिष माने याला सातारा येथील महाबळेश्वर, पाचगणी, सिद्धार्थनगर तर समीर संघानी याला राजस्थानचख्या जयपूर सिटी येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी तक्रारदारांची 22 कोटी 75 लाखांच्या हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली.

तपासात ते तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यातील हिमांशू शहा याच्याविरुद्ध एल. टी मार्ग, वरळी, डी. बी मार्ग व मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात पाच, आशिष मानेविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात तर समीर संघानी याच्याविरुद्ध वरील सर्व गुन्ह्यांत मदत केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी हिर्‍यांची परस्पर विक्री केली आहे. त्यांनी ज्या हिरे व्यापार्‍यांना हिर्‍यांची विक्री केली आहे, त्या सर्व व्यापार्‍याकडून अपहार केलेले हिरे लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page