डिजीटल अरेस्टच्या बहाण्याने वयोवृद्ध जोडप्याची 4 कोटीची फसवणुक

गुन्हा दाखल होताच सायबर टोळीच्या तीन सहकार्‍यांना अटक

0

अरुण सावरटकर
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – डिजीटल अरेस्टच्या बहाण्याने एका वयोवृद्ध जोडप्याची सुमारे चार कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी सायबर टोळीशी संबंधित असलेल्या तीन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. विलास गेणू मोरे ऊर्फ रेहान खान, रिझवान शौकतअली खान आणि कासिम रिजवान शेख अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या तिघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना वेगवेगळ्या बँक खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात मुंबईसह देशभरातील विविध ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व बँक खाती गोठविण्यात आले आहे.

यातील तक्रारदार वयोवृद्ध गोरेगाव येथे त्यांच्या पत्नीसोबत राहतात. ते सेवानिवृत्त झाले असून सध्या घरी असतात. 27 ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो ट्राय कर्मचारी असल्याची बतावणी केली होती. त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाला असून वेगवेगळ्या बँकेत खाती उघडण्यात आले आहे. या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांची मुंबई गुन्हे शाखेसह दिल्लीहून सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन काही अज्ञात व्यक्तींनी चौकशी केली होती. या चौकशीत त्यांच्यावर मनी लाड्रिंगच्या गुन्ह्यांत तक्रारदारसह त्यांच्या पत्नीचा सहभाग उघडकीस आल्याचा आरोप करण्यात आला होता.

या व्यवहारात त्यांना किती रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे असे सांगून त्यांना अटकेची धमकी देण्यात आली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्के असलेले पत्र, कोर्ट नोटीस व्हॉटअपवर पाठविण्यात आली होती. त्यांचा व्हॉटअप व्हिडीओ कॉलद्वारे सर्व्हेलन्सवर असल्याचे सांगून त्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु केली होती. हा संपूर्ण व्यवहार तपासावा लागेल असे सांगून त्यांना सिक्रेट बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांनी तसे केले नाहीतर त्यांच्या घरी पोलिसांना पाठवून त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल. अटकेनंतर त्यांची पोलीस ठाण्यातच चौकशी होईल असे सांगण्यात आले होते. अटकेसह कारवाईच्या धमकीला घाबरुन तक्रारदारांनी त्यांनी दिलेल्या बँक खात्यात 4 कोटी 5 लाख 80 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.

हा संपूर्ण प्रकार 27 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत झाला होता. पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांची कोणीही चौकशी किंवा कॉल केला नाही. चौकशी पूर्ण होताच पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आरोपींचे मोबाईल स्विच ऑफ येत होते. मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे. डिजीटल अरेस्टची भीती दाखवून या सायबर ठगांनी त्यांची फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांसह उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध तोययागिरी करुन फसवणुक करणे, आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बनकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार सुनिल नाडगौडा, पोलीस शिपाई गणेश पाटील, अक्षय साळवे, प्रथमेश चव्हाण यांनी तपास सुरु केला आहे. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी विलास मोरे, रिझवान खान आणि कासिम शेख या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्यांनीच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविले होते. त्यांच्याच बेनिफिशरी बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती. त्यानंतर ही रक्कम दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. याकामी तिन्ही आरोपींना सायबर ठगांकडून काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. आरोपींच्या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर याच खात्यात फसवणुकीच्या इतर गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे.

भारतातील अनेक सायबर पोलीस ठाण्यातून काही तक्रारी प्राप्त झाले आहे. त्यामुळे संबंधित बँक खाती गोठविण्यात आले आहेत. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page