डिजीटल अरेस्टची धमकी देऊन वयोवृद्धाची फसवणुक

खाजगी कंपनीचे बोगस खाती उघडणार्‍या दोघांना अटक

0

अरुण सावरटकर
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची धमकी देऊन एका वयोवृद्धाची फसवणुक करणार्‍या सायबर ठगांच्या दोन सहकार्‍यांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फराज जाकीर शरीफ आणि अमान गुाम मोहिद्दीन खान अशीया दोघांची नवे असून ते दोघेही अंधेरी आणि पवईतील रहिवाशी आहे. या दोघांनी फसवणुकीसाठी बोगस कंपनीचे बँकेत खाती उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करणारा संदीप राव, मोहम्मद सगीर मोहम्मद हारुण शेख, आसिफ मोहम्मद नजीर शेख यांच्यासह बँक खात्यात फसवणुकीची रक्कम प्राप्त करुन त्याची विल्हेवाट लावणारे अज्ञात व्यक्तींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

66 वर्षांचे वयोवृद्ध तक्रादार जयेश नटवरलाल मेहता हे उत्तर मुंबईत राहतात. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांना संदीप राव, विजय खन्ना, आकाश कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने कॉल केला होता. त्यांनी ते वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांचा मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल अशी भीती दाखविली होती. तोपर्यंत त्यांना त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगितले होते. या तिघांनी त्यांना चौकशीसाठी सहकार्य करा, अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल अशी धमकी दिली होती. चौकशीच्या नावाने त्यांनी त्यांच्या कुटुंबातील माहितीसह बँक खात्याचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

बँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्यांना एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच जयेश मेहता यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार प्राची मुळीक, किरण वसईकर, रवी पाटील, गणेश कोरे, अक्षय साळवे यांनी तपास सुरु केला होता.

तपासात बंगलोरच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर ती रक्कम चार वेगवेगळ्या बँक खात्यात पाठविण्यात ले होते. याच बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाली होती. भारतातील विविध राज्यातील चौदा सायबर सेलकडून संबंधित बँक खाते गोठविण्यात आले होते. या बँक खातेदाराची माहिती काढून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या आरोपींनी बँक खाते उघडण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक दिला होता. याच मोबाईल क्रमांक आणि आयएमईआयच्या क्रमांकावरुन पोलिसांनी त्यांचा शोध सुरु होता. तांत्रिक माहितीवरुन मोबाईल क्रमांक रॉयल पाम, आरे, गोरेगाव परिसरात सक्रिय असल्याचे उघडकीस आले होते.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार प्राची मुळीक, किरण वसईकर, रवी पाटील, गणेश कोरे, अक्षय साळवे यांनी फराज शेख आणि अमान खान या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांकडून पोलिसंनी तीन मोबाईल, एक लॅपटॉप, बोगस कंपनीचे स्टॉम्प पेपर, विविध बँकेचे डेबीट कार्ड व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. फसवणुकीची पाच लाखांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. ही रक्कम नंतर त्यांनी सायबर ठगांना दिले होते. अशा गुन्ह्यांतील सायबर ठगांच्या ते दोघेही नियमित संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी बोगस कंपनीच्या नावाने बँकेत खाती उघडले होते.

या बँक खात्याचा वापर फसवणुकीसाठी केला जात होता. त्यासाठी त्यांना सायबर ठगांकडून कमिशन मिळत होते. चौकशीतून आलेल्या या माहितीनंतर या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहेत, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर या दोघांना मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page