डिजीटल अरेस्टची भीती दाखवून गंडा घालणार्या चौकडीला अटक
देशविघातक कृत्यांना मदतीसह गोपनीय माहिती लिक केल्याचा केला आरोप
अरुण सावरटकर
1 एप्रिल 2026
मुंबई, – पुलवामा हल्ल्यातील दशहतवादी अफजल खान याच्या देशविघातक कृत्यांना मदतीसह गोपनीय माहिती लिंक केल्याचा आरोप करुन मुंबई एटीएस, आरबीआय, दिल्ली एनआयए, चिफ जस्टीस ऑफ इंडियासारख्या शासकीय संस्थाचा वापर करुन अधिकार्यांच्या नावाने सही आणि कार्यालयीन लोगोचा वापर करुन बोगस एफआयआर, अरेस्ट वॉरंट, गोपीनियतीचे बंधपत्र आदी बोगस दस्तावेज पाठवून एका तरुणीच्या वयोवृद्ध आजीला डिजीटल अरेस्टची धमकी देऊन सुमारे 32 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याच्या कटातील चार प्रमुख आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. निलेश प्रभाकर वासमवार, शुभम संजय जोगंड, अजय देवीदासराव ओसद्रे आणि सिद्धांत दिलीप जोधळे अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण नांदेडचे रहिवाशी आहे. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीची रक्कम संबंधित चारही आरोपींच्या बँक खात्यात जमा झाले असून या चौघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मैत्रेई विद्यासागर ही 21 वर्षांची तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत गोरेगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत आर्टिस्ट म्हणून काम करते. 11 फेब्रुवारीला तिच्या आजीच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. तामिळमध्ये बोलणार्या या व्यक्तीने तो चेन्नई पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगून मुंबई पोलिसांनी पहलगाम हल्ल्यातील एक आरोपी अफजल खान याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक सिमकार्ड जप्त केले असून त्या सिमकार्डवरुन देशाची अत्यंत गोपनीय माहिती शेअर करण्यात आली आहे. सिमकार्ड तिच्या आजीच्या नावाने घेण्यात आले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्याने तो कॉल त्याचे वरिष्ठ अधिकार्याकडे ट्रान्स्फर केला होता.
यावेळी अरुणकुमार नावाच्या व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तिची आजी तामिळनाडूच्या श्रीरंगम्म येथून मुंबईत आल्याची माहिती त्यांना माहित आहे. आम्ही तिला दोन आठवड्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. माहीम येथून त्यांचा डाटा लिक झाला असून त्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांना त्यांच्याकडून नॉन इन्व्हॉलमेंट सर्टिफिकेट घ्यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्याने तो कॉल जय अग्निहोत्री या व्यक्तीला ट्रान्स्फर केला होता. त्याने तिला आयडेंटिटी व्हेरीफिकेशनसाठी व्हिडीओ कॉल करावा लागेल असे सांगून तिला व्हिडीओ कॉल केला. त्यावर मुंबई एटीएस असे लिहिलेला लोगो होता. या प्रकाराने ते सर्वजण घाबरुन गेले होते.
समोरील व्यक्तीने पोलीस युनिफॉर्म घेतला होता. त्याने मराठीत बोलून तिला व्हिडीओ कॉल संपूर्ण घरात फिरविण्यास सांगितले. तिच्यासह तिची आजी असल्याची खात्री करुन घेतल्यानंतर त्याने तिला चौकशीला सहकार्य करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बाब कोणालाही सांगू नका. याच व्हिडीओमध्ये त्याने त्यांना अफजल खान हा त्याच्या ताब्यात असून त्याला पोलीस बेदम मारहाण करत आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला. ते पाहून ते सर्वजण आणखीन घाबरले होते. त्यानंतर त्याने तिला तिच्या आजीवर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे असे सांगून तिला या गुन्ह्यांत 90 दिवस कोठडी मिळणार आहे.
याच दरम्यान त्याने त्यांच्या आर्थिक व्यवहारासह बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला काही बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यात काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. या आर्थिक व्यवहाराची चौकशी होईल, चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांचे सर्व पैसे बँक खात्यात पाठविण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे तिने त्याने दिलेल्या बँक खात्यात 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत टप्याटप्याने 32 लाख 69 हजार 997 रुपये ट्रान्स्फर केले होतै. ही रक्कम पाठवूनही ते तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होते. मात्र पैसे नसल्याचे सांगताच त्यांनी तिला गोल्ड लोन किंवा घराची विक्री करुन पैसे ट्रान्स्फर करा असे सांगितले. तिने तिचे वडिल वर्लिनला असून ते परत येताच आम्ही पैसे पाठवून असे सांगितले. यावेळी त्याने त्यांच्या वडिलांवर आमची निगराणी असून त्यांच्यावर 24 तास वॉच असल्याचे सांगून कॉल कट केला.
16 फेब्रुवारीला तिचे वडिल बर्लिनहून मुंबईत आले होते. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितले. त्यांनी तिला हा प्रकार डिजीटल अरेस्टचा प्रकार असून तिची अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन फसवणुक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने उत्तर सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. संबंधित बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढताना नांदेडचे रहिवाशी असलेल्या चार तरुणांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम काढून त्यांनी संबंधित सायबर ठगांना दिली होती.
ही माहिती प्राप्त होताच सायबर सेलची एक टिम नांदेडला गेली होती. या पथकाने निलेश वासमवार, शुभम जोगंड, अजय ओसद्रे आणि सिद्धांत जोंधळे या चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आले होते. या चौघांनी सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खात्याची डिटेल्स दिली हेती. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. याकामी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना पुढील चौकशीसाठी आणण्यात आले.
याच गुन्ह्यांत त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे. या व्यवहाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.