अरुण सावरटकर
८ जानेवारी २०२५
मुंबई, – मनी लॉड्रिंगसह बोगस ऑनलाईन जाहिरात दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची बतावणी करुन डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका ४९ वर्षांच्या व्यक्तीची सुमारे ३२ लाख रुपयांची फसवणुक करणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका चौकडीला पोलिसांनी अटक केली असून या चौघांनी सायबर ठगांना बँक पुरविल्याचा आरोप आहे. गंगाविहान जोताराम भोजू, विकास मनोहरलाल बिश्णोई, प्रेमसुख सोहनराम बिश्णोई आणि रामनिवास रामलराम बिश्णोई अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
४९ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या वयोवृद्ध आईसोबत कांदिवली येथे राहतात. सध्या निवृत्ती झाले असून त्यांच्या बचतीच्या रक्कमेतून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता घरी असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. भारत सरकारच्या ट्राय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्घ दिल्लीतील आर. के पूरम पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. यासंदर्भात त्यांना संबंधित पोलीस अधिकार्याशी बोलावे लागेल असे सांगून त्यांचा कॉल ट्रान्स्फर केला होता. यावेळी समोरुन बोलणार्या व्यक्तीने त्याचे नाव गोपेशकुमार सीपी असल्याचेसांगून त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग तसेच ऑनलाईन बोगस जाहिरात केल्याचा आरोप आहे. त्यांचे पोलीस उपायुक्त अनिल शर्मा यांना त्यांच्याशी बोलायचे आहे असे सांगून त्यानेही त्यांचा कॉल ट्रान्स्फर केला होता. त्यानंतर त्यांच्याशी पोलीस उपायुक्त असलेल्या अनिल शर्माने संभाषण सुरु केले होते. त्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियांची माहितीसह कामाचे ठिकाण आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी त्याला ती सर्व माहिती सांगितली होती. यावेळी अनिल शर्माने त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु आहे.
या कारवाईची माहिती कोणालाही शेअर करु नका. तसे केल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, त्यांच्यावर खटला चालविला जाईल असे धमकी देत त्यांचा मोबाईल त्यांच्या ऑनलाईन सर्व्हेलन्सखाली असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यालयातून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. दुसर्या दिवशी त्यांना सीबीआय अधिकारी असलेल्या नवज्योत सिमी नावाच्या व्यक्तीने कॉल केला होता. त्यानेही त्यांना त्यांच्याविरुद्घ गुन्हा दाखल झाल्याचे त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने त्यांच्या नावाचे अटक वॉरंट, बँक अकाऊंट फ्रिज वॉरंट आणि इतर नोटीस पाठविली होती. त्यात रिझर्व्ह बँकेचा लोगोआणि खाली रबर स्टॅम्प होता. यावेळी त्याने त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगितले. या प्रकाराने ते प्रचंड मानसिक तणावात आले होते. घाबरले होते. त्यांना कोणाशी संपर्क साधता येत नव्हता. त्यांच्या परवानगीशिवाय काहीच काम करता येत नव्हते. काही वेळानंतर नवज्योत सिमी याने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांच्या बँक खात्यातील सर्व पैसे एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी झाल्यानंतर तीन दिवसांत ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल. त्यामुळे ते बँकेत गेले आणि त्यांनी कारवाईच्या भीतीपोटी संबंधित बँक खात्यात सुमारे ३२ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.
घरी आल्यानंतर त्यांनी त्याला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना कोणाचाही कॉल आला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांसह सायबर सेल आणि सायबर सेल हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलला तपासाचे आदेश दिले होते. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गंगाविहान, विकास, प्रेमसुख आणि रामनिवास या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. फसवणुकीची ही रक्कम या चौघांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्यांनी संबंधित सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. चारही आरोपी काही सायबर ठगांच्या संपर्कात असून त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. पोलीस तपासात ही माहिती उघड होताच या चौघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या बँक खात्याची माहिती काढली जात असून या खात्यात अन्य कुठले आर्थिक व्यवहार झाले याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
आता जाणून घेऊ काय आहे डिजीटल अरेस्ट
डिजिटल अटक प्रकारात सायबर ठग हे स्वतःला पोलीस किंवा सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. ड्रग आणि मनी लौंड्रीगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवतात. तुम्हाला अटक करू असे सांगून ठग हे नागरिकांना घाबरवतात. कोणत्याही कायद्यानुसार फोन किंवा विडिओ कॉल द्वारे अटक करण्याची तरतूद कायद्यात नाही.
स्काईप अप्सवर करतात संपर्क
सायबर ठग हे कधी परदेशात साहित्य पाठवले आहे असे सांगून आधारकार्ड आणि फोन नंबर घेतात. त्यानंतर प्ले स्टोअरवरचे स्काईप अप्स डाऊन लोड करण्यास भाग पाडतात. त्यानंतर अटक झाल्याचे विडिओ कॉलवर सांगतात. ठग हे खोटे आरोप करून खचीकरण करतात. जर कुटुंबात कोणाला सांगितली, त्यांना देखील अटक करू अशी देखील भीती घातलात. ठग हे जेथून विडिओ कॉल करतात, त्याचे बॅक ग्राउंड पोलीस ठाण्या सारखे करतात. जेणे करून ते पोलीस ठाणे असावे असे नागरिकांना वाटते. केस बंद करण्यासाठी ठग हे पैशाची मागणी करतात.
सतर्क राहणे महत्वाचे
पोलीस अधिकारी हे कधीच व्हिडिओ कॉल करत नाही. तसेच कोणतेही अप्स डाऊन लोड करण्यास सांगत नाही. ओळखपत्र, अटक वॉरंट हे ऑनलाईन शेअर करत नाही. तसंच पोलीस हे कधीच विडिओ कॉल वर साक्ष नोंदवत नाही. पोलीस हे कधीच पर्सनल नंबरवर कॉल करून धमकावत नाही. कोणत्याही तपास यंत्रणा या व्हाट्सअप आणि स्काईप सारखे ऑनलाईन अप्स वापर करत नाही. ठग हे फसवणुकीसाठी हे अप्स वापरतात. ठग फसवणूक करतात हे संशय आल्यावर तात्काळ फोन कट करावा. ठग हे गुन्हे दाखल झाल्याचे मेसेज ईमेल पाहवतात. त्याकडे लक्ष देऊ नये. कोणालाही बँक खात्याचा तपशील आणि युपीआय आयडी शेअर करू नये . जर ठग हे विडिओ कॉल वर प्रश्न विचारत असतील तर त्याना तात्काळ उत्तरे देऊ नका, त्यांना कोणताही तपशील शेअर करू नये . अशा फसवणुकीच्या कॉलचे रेकॉर्डिंग करता आले तर ते करावे