डिजीटल अरेस्टच्या नावाने 1.57 कोटीच्या अपहारप्रकरणी रिक्षाचालकास अटक
मनी लॉड्रिंगसह अश्लील एमएमएस पाठवून खंडणी मागितल्याचा आरोप
अरुण सावरटकर
29 मार्च 2026
मुंबई, – डिजीटल अरेस्टची धमकी देऊन एका खाजगी कंपनीच्या निवृत्त वयोवृद्ध अधिकार्याची 1 कोटी 57 लाख रुपयांची फसवणुक केलयाप्रकरणी अशोक पाल या आरोपी रिक्षाचालकाला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अशोक पालवर सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. या टोळीने मनी लॉड्रिंगसह अश्लील एमएमएस पाठवून खंडणीचे दोन गुन्हे दाखल झाल्याची बतावणी करुन या अधिकार्याची फसवणुक केली होती. अटकेनंतर अशोकला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कृष्णप्पा शामन्ना त्यागराजन हे 69 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अंधेरीतील डी. एन नगर, महालक्ष्मी टॉवर्स अपार्टमेंटमध्ये राहतात. पीआय इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतून ते सिनिअर मॅनेजमेंट या पदावरुन निवृत्त झाले असून गेल्या दोन वर्षांपासून घरी असतात. 6 डिसेंबर 2025 रोजी घरी असताना त्यांना संजयकुमार गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो टेलिकॉम अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या मोबाईलवरुन काही लोकांना अश्लील पोर्नोग्राफी एमएमएस पाठविणे आणि त्यांच्याकडून खंडणीसाठी धमकी दिले जात असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध वांद्रे येथील गुन्हे शाखेत गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यांचा तपासाकामी त्यांची गुन्हे शाखेचे अधिकारी प्रदीप सावंत यांच्याकडून चौकशी होणार आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने तो कॉल ट्रॉन्स्फर केला होता. यावेळी प्रदीप सावंत नाव सांगणार्या व्यक्तीने त्यांना बीकेसी येथील गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकरणात काही पोलीस अधिकार्यांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या जिवाला धोका आहे. तसेच त्यांचे नाव नरेश गोयल याच्या मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत समोर आले असून याबाबत त्यांची वरिष्ठ अधिकारी विजय खन्ना हे चौकशी करणार आहे. नरेश गोयलने त्याच्या चौकशीत त्यांचे बँक खाते दिल्याचा आरोप केला असून या बँक खात्यात मनी लॉड्रिंगची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्याने आतापर्यत 247 जणांची फसवणुक केली असून त्यांची ही रक्कम त्यांच्याच बँक खात्यात वळविण्यात आली होती.
ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता, त्यांनी या दोन्ही गुन्ह्यांशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांना डिजीटल अरेस्टची धमकी देऊन व्हिडीओ कॉलद्वारे बी. एस गवई यांच्या कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही गुन्हे गंभीर असल्याचे सांगून त्याचा तपास दिल्ली पोलिसांकडे वर्ग केले. तोपर्यंत त्यांचे सर्व म्युचल फंड, फिक्स डिपॉझिट, सॅलरीचे सर्व पैसे पोलीस सांगतील त्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. या गुन्ह्यांत निर्दोष सुटका होताच त्यांना त्यांची रक्म परत केली जाईल असे आदेशात नमूद केले होते. तसेच त्यांनी पैसे जमा केले नाहीतर त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश जारी केले होते. अटकेच्या भीतीने त्यांनी 8 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत संबंधित बँक खात्यात 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
मात्र ही रक्कम ट्रान्स्फर होताच त्यांची चौकशी बंद झाली होती. त्यांना गुन्हे शाखेसह इतर कुठल्या अधिकार्यांनी संपर्क साधला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या कुटुंबियासोबत परिचितांना ही माहिती दिली. यावेळी त्यांची सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी ही रक्कम ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यातील अशोक पाल याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अशोक पालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो रिक्षाचालक असून पैशांसाठी त्याने सायबर ठगांना त्याच्या बँक खात्याची माहिती पुरविल्याचे उघडकीस आले. ही रक्कम सायबर ठगांना पाठविल्यानंतर त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींनी सायबर ठगांना बॅक खाती पुरविल्याचे, या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे संबंधित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.