राजू परुळेकर
११ जानेवारी २०२४
मुंबई, – पोलीस शिपाई चालक भरती परिक्षा २०२५ साठी जोगेश्वरीतील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये परिक्षा देण्यासाठी आलेल्या एका परिक्षकाला डिजीटल कॉपी करताना ओशिवरा पोलिसांनी रंगेहाथ पकडले कृष्णा महादेवराव दळवी असे या २५ वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा जालनाचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चिपसह ब्लूट्यूथ जप्त केला आहे. परिक्षा सुरु असताना तो एका मित्राच्या संपर्कात राहून त्याची मदत घेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलीस शिपाई होण्यापूर्वी कृष्णा दळवी याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
मुंबई पोलीस दलात सध्या पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती सुरु आहे. त्यासाठी शनिवारी मुंबई शहरात संबंधित उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली होती. जोगेश्वरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोड, रायगड मिलिटरी स्कूलमध्ये काही उमेदवारासाठी परिक्षा ठेवण्यात आली होती. तिथे ४४० उमेदवार परिक्षा देण्यासाठी आले होते. त्यात ४३७ उमेदवार जालना जिल्ह्याचे होते. परिक्षा केंद्रात प्रवेश देताना सर्व उमेदवारांची तपासणी करण्यात आली होती. काही वेळानतर एक उमेदवाराची हालचाल संशयास्पद वाटताच केंद्र प्रमुख आणि पोलीस निरीक्षक विजय मांडये यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे पोलिसांना एक चिप आणि ब्ल्यू टूथ सापडले. तो डिजीटल कॉपी करत असल्याचे उघडकीस येताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने परिक्षा देत असल्याची कबुली दिली. त्यासाठी त्याने अंडर गारमेंटमध्ये डिजीटल चिप लपवून आणले होते. तसेच कानात ब्ल्यू टूथ लावला होता. हा ब्ल्यू टूथ कोणालाही दिसणार नाही याची पुरेपुरे त्याने काळजी घेतली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. पोलीस शिपाई होण्यापूर्वीच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या घटनेने तिथे उपस्थित उमेदवारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.