८५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाला एक वर्षांनी अटक
बकरा संबोधून पैसे देण्यासाठी घेतले नसल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी
अरुण सावरटकर
१४ डिसेंबर २०२४
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सव्वावर्षांत गुंतवणुक रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे ८५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी अन्वरअली मोहम्मद हसन मच्छीवाला या आरोपी व्यावसायिकाला एक वर्षांनी दिडोंशी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत सखी हैदर सय्यद ऊर्फ भल्लू, अर्चना सत्येंद्र सिंग आणि नाजी सखी हैदर सय्यद यांचा सहभाग उघडकीस आला असून पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. गुंतवणुक रक्कम घेतल्यानंतर दिड वर्षांनी या सर्व आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाला तू आमच्यासाठी एक बकरा होतास. तुझ्याकडून पैसे घेण्यासाठी मैत्री केली, पैसे परत करण्याचा आमचा कधीच विचार नव्हता, त्यामुळे पैशांसाठी पुन्हा कॉल केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
जोगेश्वरीतील रहिवाशी असलेले इशाक हुन्नेमियॉ सय्यद हे व्यावसायिक असून त्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. जोगेश्वरी येथे त्यांची एम. एम इंपोर्ट ऍण्ड एक्सपोर्ट नावाची एक कंपनी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाकडून सखी हैदरशी ओळख झाली होती. तो जोगेश्वरी येथे राहत असून त्याचा भंगार सामान खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांनी ते दोघेही चांगले मित्र झाले होते. यावेळी त्यांनी त्याला अनेकदा त्याच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत केली होती. ऑक्टोंबर २०१९ रोजी सखीने त्यांची ओळख त्याची पत्नी नाझीसह अर्चना सिंग आणि अन्वरअलीशी करुन दिली होती. अर्चना आणि अन्वरअलींचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. या ओळखीनंतर ते सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होता. एक महिन्यांत ते सर्वजण इशाक सय्यद यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी दोन प्रोजेक्ट हाती घेतले आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ही मदत मिळाली नाहीतर त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. दिलेल्या वेळेत पैसे परत करुन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर संबंधित चारही आरोपी त्यांच्याकडून वेळोवेळी व्यवसायासाठी पैसे घेत होते.
काही दिवसांनी सखीसह नाझी, अर्चना यांनी इशाक सय्यद यांची भेट घेऊन अन्वरअलीने एका खाजगी कंपनीकडून एक हजार टन लोखंडी भंगार घेतले आहे. त्याची किंमत १ कोटी ६५ लाख रुपये आहे. आगाऊ म्हणून त्याने कंपनीला साठ लाख रुपये दिले आहे. उर्वरित रक्कम देण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. या संपूर्ण व्यवहारात त्याला सुमारे अडीच कोटी रुपये मिळणार होते. त्यामुळे त्यांनी इशाक सय्यद यांना आर्थिक मदत करण्याची विनंती करुन त्यांना भंगार विक्रीतून येणार्या प्रॉफिटमधून बारा ते पंधरा महिन्यांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या व्यवसायात ८५ लाख ४८ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. दिड वर्षांनी त्यांना गुंतवणुक रक्कम दुप्पट मिळणार होती, त्यामुळे त्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या सर्व आरोपींनी त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या मित्राच्या मोबाईलवरुन सखी हैदरला संपर्क साधला होता. यावेळी तयाने डिसेंबर २०२० पर्यंत त्यांना १ कोटी ७० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. वारंवार संपर्क साधूनही त्यांनी त्याना प्रतिसाद दिला नाही.
याच दरम्यान या आरोपींनी त्यांना पैशांसाठी फोन करु नकोस किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करु नकोस. तू आमच्यासाठी एक बकरा होता. तुझ्याकडून पैसे काढण्याचा आमचा मानस होता, तुला कधीच आम्ही पैसे परत करणार नव्हतो. त्यामुळे तुला काय करायचे ते कर असे सांगून पुन्हा पैशांसाठी कॉल केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांना ही माहिती सांगून संंबंधित पाचही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ५०६ (२), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पाचही आरोपी पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अन्वरअली मच्छीवाला याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.