डॉलरच्या नावाने गंडा घालणार्या झारखंडच्या टोळीचा पर्दाफाश
मुख्य आरोपीसह तिघांना अटक; अनेक गुन्ह्यांची उकल होणार
राजू परुळेकर
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – स्वस्तात डॉलरच्या नावाने गंडा घालणार्या एका झारखंडच्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रिकाऊल अब्दुल रेहमान हक, नसीब मलिक शेख आणि आसिफ असरुद्दीन शेख अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे झारखंडचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही शनिवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या अटकेने अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
३४ वर्षांचे शंकर रामप्रसाद मल्ला हे व्यावसायिक असून अंधेरीतील आझादनगर परिसरात राहतात. देवेंद्रकुमारकुमार हे त्यांचे काका आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत त्यांचा परिचित राहुलने त्यांना त्याच्याकडे डॉलर असल्याचे सांगून ते डॉलर त्यांना स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून मोहम्मद रिकाऊलने त्यांना दोन डॉलर दाखविले होते. स्वस्तात डॉलर मिळत असल्याने त्यांनी ते डॉलर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे देवेंद्रकुमार हे शंकर मल्लासोबत वडाळा रेल्वे स्थानकात गेले होते. यावेळी जवळच असलेल्या टॅक्सी स्टॅण्डजवळ मोहम्मद रिकाऊल हा त्याच्या एका मित्रासोबत उभा होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला तीन लाख रुपयांचे भारतीय चलन दिले होते. मात्र डॉलर आणि जास्त मोबदला न देता त्यांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच शंकर मल्ला यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांतकुमार पाटील, पोलीस हवालदार पाटील, कासार, घुगे, बाबर यांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच ही टोळी पुन्हा फसवणुकीच्या उद्देशाने जोगेश्वरी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद रिकाऊल, नसीम शेख आणि आसिफ शेख या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच शंकर मल्ला यांना डॉलर देतो सांगून त्यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. त्यानंतर या तिघांनाही शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिन्ही आरोपी मूळचे झारखंडचे रहिवाशी असून सध्या ठाण्यातील कळवा परिसरात राहतात. या तिघांनी डॉलरच्या आमिषाने अनेक गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.