मर्डरच्या गुन्ह्यांत कारवाईची धमकी देऊन 99 लाखांची खंडणी वसुली

इन्काऊंटरसह कुटुंबियांच्या अपहरणाची धमकी देणार्‍या दोघांना अटक

0

अरुण सावरटकर
20 डिसेंबर 2025
मुंबई,  – आधी मर्डरची सुपारी दिल्याचा आरोप करुन नंतर सुपारी देणार्‍या आरोपीचीच मर्डर केल्याची बतावणी करुन या संपूर्ण प्रकणात सहीसलामत बाहेर काढण्यासाठी एका व्यावसायिकाकडून चारजणांच्या एका टोळीने मुंबई पोलिसांच्या नावाचा गैरवापर करुन एका वर्षांत 99 लाखांची खंडणी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास त्यांचा इन्काऊंटर आणि कुटुंबियांचे अपहरण करण्याची धमकी दिली. सततच्या खंडणीसाठी येणार्‍या धमक्यांना कंटाळून व्यापार्‍याने घरातून पळ काढला, मात्र डहाणू येथून ताब्यात घेतल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खंडणीसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन आरोपींना दिडोंशी पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एका आरोपीचे नाव अविनाश शिंदे ऊर्फ प्रकाश कांटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

राहुल टेकचंद गुप्ता हे मालाड परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या मालकीची एक गॅस एजन्सी आहे. 15 डिसेंबरला राहुल गुप्ता हे घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही, त्यामुळे त्यांची पत्नी निकिता गुप्ता हिने दिडोंशी पोलिसांत त्यांची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याचा दिडोंशी पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना राहुल गुप्ता यांना डहाणु रेल्वे स्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीने पोलिसांना धक्का बसला होता. त्यांचा प्रविण खेडकर नावाचा एक व्यक्ती परिचित असून तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांच्याकडून गणेशोत्सव मंडळासाठी वर्गणी घेऊन जात होता. सप्टेंबर महिन्यात त्याने त्यांना कॉल करुन आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यामुळे त्यांनी त्याला काही रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केली होती.

याच दरम्यान त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो सहपोलीस आयुक्त बोलत असून त्याचा मित्र प्रविण खेडकर याने एका व्यक्तीचा मर्डर केला आहे. त्याला मर्डरसाठी त्याने सुपारी दिली होती. त्यांच्याकडे त्यांनी प्रविणला पैसे पाठविल्याचे पुरावे असून त्यांना या गुन्ह्यंत अटक करण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्यांत अटक टाळायची असेल तर त्याने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. या घटनेने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी मालाड येथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्धाला 50 हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तुला वाचविण्यासाठी त्यांनी प्रविण खेडकर याची आम्ही मर्डर केली आहे.

या संपूर्ण प्रकरणातून त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्याकडे त्याने दोन लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच वयोवृद्धाला दोन लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन इतर दोघांनी कॉल केले होते. त्यापैकी एका व्यक्तीने त्याचे नाव पोलीस अधिकारी अविनाश शिंदे असल्याचे सांगून त्याच्याकडेच प्रविण खेडकर याच्या मर्डरचा तपास आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी सहपोलीस आयुक्तासह इतर पोलिसांना मॅनेज करावे लागेल असे सांगून पैशांची मागणी केली होती. या प्रकरणातून तुझी सुटका नाही. पैसे दिले तर तुला त्यातून आम्ही बाहेर काढू असे सांगितले.

त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींना सप्टेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत टप्याटप्याने रोख स्वरुपात 80 लाख आणि ऑनलाईन स्वरुपात 19 लाख 16 हजार असे 99 लाख 16 हजार रुपये दिले होते. मात्र ही रक्कम देऊन संबंधित आरोपी त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. यावेळी या व्यक्तीने पैसे दिले नाहीतर त्यांचा इन्काऊंटर करण्याची तसेच त्यांच्या कुटुंबियांचे अपहरणाची धमकी दिली होती. या प्रकारामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यातून सुटका करण्यासाठी ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यांच्या पत्नीने मिसिंग तक्रार केल्यानंतर त्यांना डहाणू येथून ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर राहुल गुप्ता यांची पोलिसांनी सविस्तर जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या नावाने खंडणीसह अपहरण आणि इन्काऊंटरची धमकी देणार्‍या चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींच्या मोबाईल क्रमांकावरुन त्यांचे सीडीआर काढण्यात आले होते. या सीडीआरवरुन पोलिसांनी अविनाश शिंदे ऊर्फ प्रकाश कांटे व त्याच्या एका सहकार्‍याला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेषम मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page