बिल्डरला खंडणीसाठी धमकी देणारा बाबा खान गजाआड

आतापर्यंत 57 लाखांची खंडणी उकाळल्याचे तपासात उघड

0

अरुण सावरटकर
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बोगस गुन्हे दाखल करण्यासह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देऊन एका बिल्डरला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मुनाफ अब्दुल रेहमान लांबे ऊर्फ बाबा खान या रेकॉर्डवरील गुंडाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. त्याने तक्रारदार बिल्डरकडून आतापर्यंत 57 लाखांची खंडणीची रक्कम उकाळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार व्यवसायाने बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत बाहेर काढण्यासाठी त्यांन बाबा खान याने आश्वासन देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रकरण मिटविण्याासठी पोलिसांनी मॅनेज करावे लागेल, त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार मुंबईत होणार नसून पुण्यात पोलिसांना पैसे द्यावे लागेल असे सांगितले. पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध आणखीन काही बोगस गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर अटकेची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी या धमक्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे तो त्यांना सतत शिवीगाळ करुन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत होता.

तसेच या संपूर्ण प्रकरणातून वाचायचे असेल तर त्याला पैसे द्यावे लागतील असे सांगून तो त्यांच्याकडे सतत खंडणीची मागणी करत होता. त्याच्या धमक्यांना कंटाळून त्यांनी त्याला ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत टप्याटप्याने सुमारे 57 लाख रुपये दिले होते. ही रक्कम ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात देण्यात आली होती. ही रक्कम देऊनही तो त्यांना आणखीन पैशांसाठी धमकी देत होता. त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत होता. या धमकीमुळे त्यांना प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांना भेटून घडलेला प्रकार सांगून बाबा खान याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची त्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांनी तक्रारदाराच्या जबानीवरुन बाबा खान याच्याविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच बाबा खान याला गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे व अन्य पोलीस पथकाने अटक केली.

तपासात बाबा खान हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून याच परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गोरेगाव, दिडोंशी, कुरार आणि नागपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विनयभंग, लैगिंक अत्याचारासह खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. बाबा खानने मोबाईलवरुन अनेकदा तक्रारदारांना खंडणीसाठी धमकी दिली असून धमकीचे रेकॉर्डिंग असल्याचे दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page