ब्लॅकमेलसह खंडणीसाठी धमकाविणार्‍या चारजणांच्या टोळीला अटक

अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायल करण्याची दिली होती धमकी

0

अरुण सावरटकर
18 डिसेंबर 2025
मुंबई, – मालाड परिसरातील एका व्यावसायिकाला ब्लॅकमेलसह खंडणीसाठी धमकाविणार्‍या एका टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला. अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या चारजणांच्या टोळीने तक्रारदार व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अनमोल राज अरोडा, लकी संतोष वर्मा, हिमांशू योगेश कुमार आणि दिपाली विनोद सिंग अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अनमोल, हिमांशू आणि दिपाली हे तिघेही अंधेरीतील वर्सोवा गाव तर हिमांशू हा मालाडच्या मढ परिसरात राहतो. ते चौघेही अ‍ॅक्टर असून बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी सध्या स्ट्रग्लर करत होते. मात्र ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणे या चौघांनाही चांगलेच महागात पडले आहे. झटपट पैशांसाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

37 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्यांचे काही न्यूड व्हिडीओ माझ्याकडे आहेत, त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत या व्यक्तीने तो व्हिडीओ व्हायरल होऊ नये असे वाटत असल्यास त्यांना त्याला नऊ लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली होती. काही वेळानंतर त्याने त्यांना त्यांचे न्यूड व्हिडीओ व्हॉटअपवर पाठविले होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांना अन्य एकज्ञा मोबाईल क्रमांकावरुन दुसर्‍या व्यक्तीने अशाच प्रकारे ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यांना इंटाग्रामवर त्यांचा व्हिडीओ पाठवून त्यांच्यावर खंडणीच्या रक्कमेसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

याच दरम्यान संबंधित आरोपींनी त्यांच्या भाचा आणि त्यांच्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांचा अश्लील व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ पाठविल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा कॉल करुन खंडणीच्या रक्कमेबाबत विचारणा केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना खंडणीची रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र नऊ लाख रुपये जास्त असल्याने त्यांनी त्यांना सहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीची दुष्यंत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तक्रारदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तक्रारदारांनी पोलिसांच्या सांगण्यावरुन संबंधित आरोपींना खंडणीची रक्कम घेण्यासाठी गोरेगाव परिसरात बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, विवेक कॉलेजवळ चारजण आले होते. यावेळी या चौघांनाही पोलिसांनी शिताफीने अटक केली. चौकशीत त्यांची नावे अनमोल अरोडा, लकी वर्मा, हिमांशू कुमार आणि दिपाली सिंग असल्याचे उघडकीस आले. चारही आरोपी तक्रारदारांचे परिचित असून यातील अनमोल हा त्यांचा मित्र आहे. अनेकदा ते दोघेही एकत्र पार्टीसाठी एकत्र बसत होते. याच दरम्यान त्याने त्यांचे न्यूड व्हिडीओ बनविला होता. त्यांच्याकडे पैसे असल्याची माहिती असल्याने त्याने याच व्हिडीओच्या मदतीने त्यांना ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देण्याची योजना बनविली होती.

याकामी त्याने इतर तिघांची मदत घेतली होती. प्रत्येकाला खंडणीच्या रक्कमेतून काही कमिशन देण्याचे ठरले होते. त्यापैकी दिपालीला वीस हजार रुपये मिळणार होते. मात्र ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणे या चौघांना चांगलेच महागात पडले होते. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल जप्त केले असून या मोबाईलमध्ये तक्रारदाराचे न्यूड व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page