पंतप्रधनाच्या नावाच्या शुभेच्छा पत्रासाठी समाजसेविकेकडे खंडणीची मागणी
खंडणीचा चार लाखांचा हप्ता घेण्यासाठी आलेल्या दोघांना अटक
अरुण सावरटकर
5 एप्रिल 2026
मुंबई, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षारीचे शुभेच्छा पत्र पाठवून एका समाजसेविकेकडून चार लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी समाजसेविकेच्या तक्रारीवरुन संबंधिताविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच खंडणीची हप्ता घेण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. तौसिफ हुसैन इस्माईल पटेल आणि सिद्धीनाथ दिनानाथ पांडे ऊर्फ सुनिल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गोरेगाव येथील शास्त्रीनगरचे रहिवाशी आहे. सध्या ते दोघेही टार्गेट मिडीयामध्ये अॅडव्हरटायझिंगचे काम करतात. अटकेनंतर दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.
यातील तक्रारदार महिला समाजसेविका असून तिची एक खाजगी एनजीओ संस्था आहे. ही संस्था गरीब मुलांना शैक्षणिक, वृद्धाश्रम व अनाथाश्रमाला मदत करते. समाजसेवा करताना त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत जात होत्या. अशाच एका कार्यक्रमांत तिची तौसिफ आणि फरनाझ वाडियाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. 18 मार्चला तौसिफने त्यांना एक व्हाईस नोट पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभेच्छाचे पत्र पाहिजे आहे का याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर त्याने त्यांना पुन्हा व्हाईस नोट पाठवून शुभेच्छा पत्र खरे असून ते थेट पंतप्रधान कार्यालयातून पाठविले जाते. त्यासाठी त्यांना काही चार्ज द्यावा लागेल असे सांगून तिच्याकडे चार लाखांची मागणी केली होती.
28 मार्चला फरनाझ वाडिया हिने तिच्या मोबाईलवर पंतप्रधानाचे शुभेच्छा पत्र पाठविले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या नावानिशी तिला वाढदिवसासह तिच्या समाजकार्याबाबत शुभेच्छा दिसल्याचे नमूद करण्यात आले होते. फरनाझने तिला ते पत्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची सूचना केली होती. त्यामुळे तिने ते पत्र सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. यावेळी तिच्यासोबत काम करणार्या सिद्धेश धाऊसकर आणि महेश दायमा यांनी ते पत्र पाहिले. त्या पत्राची शहानिशा केल्यानंतर ते पत्र बोगस असल्याचे सांगितले. हा प्रकार उघड होताच तिने सोशल मिडीयावरुन ते पत्र डिलीट केले होते. 30 मार्चला फरनाझने तिला संपर्क साधून शुभेच्छा पत्राबाबत पैशांची मागणी केली होती.
मात्र तिने प्रत्यक्षात भेटल्यांनतर पैशांविषयी बोलू असे सांगितले. त्यांनतर ती सिद्धेश धाऊसकर यांच्यासोबत वरळीतील एका हॉटेलमध्ये गेले होते. काही वेळानंतर तिथे फरनाझ आणि तौसिक आले. त्यांनी त्यांना पंतप्रधानाचे ओरिजनल पत्र दाखविण्यास सांगितले. यावेळी या दोघांनी ते पत्र कुरिअरने पाठविले जात असून मेलवरुन प्राप्त झाल्याचे सांगून पत्र बोगस नसून खरे आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयात त्यांचा एक माणूस काम करत असून त्यानेच ते पत्र मेलवरुन पाठविल्याचे सांगितले. चार लाख रुपये दिल्यानंतर त्यांना ओरिजनल पत्र फे्रममध्ये बनवून दिले जाईल असे सांगितले. मात्र त्यांनी त्यांना चार लाख रुपये देण्यास नकार दिला. मात्र ते दोघेही त्यांना सततत पैशांसाठी संपर्क साधत होते.
या दोघांनी फसवणुकीच्या उद्देशाने नरेंद्र मोदी यांचे नावाने त्यांना शुभेच्छा पत्र देणारे बोगस पत्र पाठवून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या नावाने बोगस ईमेल आयडी पाठवून त्यांना संबंधित बोगस पत्र पाठविले होते. त्यामुळे तिने वरळी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसह फसवणुक तसेच भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पंतप्रधानाच्या नावाने आरोपींनी फसवणुकीचा प्रयत्न करुन खंडणीची मागणी केल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविला होता.
हा तपास हाती घेताना पोलिसांनी तक्रारदारांच्या मदतीने आरोपींना खंडणीची रक्कम घेण्यासाठी वरळीतील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी वरळीतील हॉटेल सी कॉर्नरमध्ये तौसिफ पटेल आणि सिद्धीनाथ पांडे हे खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना चार लाखांची रक्कम घेताना या अधिकार्यांनी अटक केली. चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यांच्याकडून पोलिसांनी 20 मार्च 2026 रोजीचे तक्रारदाराच्या नावाने वाढदिवसांचे शुभेच्छा पत्राची फे्रम, दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. या टोळीने अशच प्रकारे इतर काही लोकांना पंतप्रधानाच्या नावाने बोगस शुभेच्छा पत्र दिले आहेत का, त्यांच्याकडे पैसे घेतले आहेत, त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील हुबेहुबे पत्राचा वापर केला असून त्यात बोगस स्वाक्षरी केल्याचे उघडकीस आले. ते पत्र कोठून बनविले, त्यावर कोणी स्वाक्षरी केली. या गुन्ह्यांत फरनाझ वाडियासह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.