१.७८ कोटीच्या बोगस गोल्ड लोनप्रकरणी खातेदाराला अटक
चार गोल्ड व्हॅल्यूअरसह बारा खातेदारांकडून बँकेची फसवणुक
राजू परुळेकर
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोगस गोल्ड तारण ठेवून एका नामांकित बँकेची १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणुक कटातील एका वॉण्टेड खातेदाराला सहा महिन्यानंतर गजाआड करण्यात अखेर गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. नरेंद्र यशवंत गोसावी असे या खातेदाराचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत इतर पंधराजण सहआरोपी असून त्यात बँकेच्या चार गोल्ड व्हॅल्यूअरसह अकरा खातेदारांचा समावेश आहे. कुसोजी विरा ब्रम्हचारी, नागराज कटकोवाला, सुनिलकुमार शुक्ला, सुभाषचंद्र सिंघवी, नवनाथ गोरख शिंदे, रेखा सोमू गौडा, सचिन सखाराम मुरुडकर, मुद्दसर मुस्ताक मोमीन, स्वेता सचिन मुरुडकर, सविता नटराज गौडा, सोमू नानजी गौडा, मिना फतेह चेलानी, प्रशांत प्रभाकर बनसोडे, मंजुळा रवी गौडा, रविंद्र दशरथ चव्हाण अशी या आरोपींची नावे समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजीत गंगाराम शिरोडकर हे कांदिवलीतील महावीरनगरचे रहिवाशी आहेत. ते फोर्ट येथील एका बँकेत स्ट्रेस सेंटमेंट मॅनेजमेंट शाखेत मॅनेजर म्हणून कामाला आहेत. त्यांच्या बँकेची गोरेगाव येथील एस. व्ही रोडवर, फिल्मीस्तान स्टुडिओसमोर एक शाखा असून तिथे त्यांनी मे २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मॅनेजर म्हणून काम केले होते. त्यांच्या खातेदारांसाठी बँकेने गोल्ड लोनची योजना सुरु केली होती. यावेळी खातेदारांनी दिलेले सोने प्रमाणित करणे, सोन्याची गुणवत्ता प्रमाणिक करणे, दागिन्याचे वजन करुन त्याची किंमत, सोन्यावर देण्यात येणार्या कर्जाचे प्रमाण निश्चित करणे आदी कामासाठी बँकेने काही गोल्ड व्हॅल्यूअरची नेमणूक केली होती. त्यात कुसोजी ब्रम्हचारी, नागराज कटकोझवाला, सुनिलकुमार शुक्ला, किशन चव्हाण, सुभाषचंद्र सिंघवी रविंद्रचारी कसुजु यांची नियुक्ती केली होती. ६ जुलै २०२१ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत त्यांच्या बँकेने बारा खातेदारांना गोल्ड लोन दिले होते. २५ ऑक्टोंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्या विविध २९ बँक खात्यात १ कोटी ७८ लाख ३७ हजार २५८ रुपये ट्रान्स्फर केले होते. चालू वर्षांत बँकेने त्यांच्या सर्वच शाखांमध्ये स्पेशल फोकस ऑडिट ऑफर गोल्ड ही योजना सुरु केली होती. त्यात बँकेकडून गोल्ड घेणार्या खातेदारांनी बँकेत जमा केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची नितेश मिश्रा व किशन चव्हाण यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती. यावेळी बँकेतून गोल्ड लोन घेणार्या बारा खातेदारांनी बँकेत जमा केलेले सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले.
विशेष म्हणजे ते दागिने बोगस असल्याचा माहित असताना गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम करणार्या अधिकार्यांनी ते दागिने खरे असल्याचे सांगून संबंधित खातेदारांना गोल्ड लोन देण्याची संमती दर्शविली होती. याबाबत एक रिपोर्ट नंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने अजीत शिरोडकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित बारा खातेदारासह चार गोल्ड व्हॅल्यूअर अशा सोळाजणांविरुद्ध ४०६, ४०९, ४२०, ४६३, ४६४, ४६५, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या नरेंद्र गोसावी या खातेदाराला पोलिसांनी अटक केली. नरेंद्रने बोगस सोने देऊन बँकेतून लोन घेतल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.