बोगस हेल्थ पॉलिसी क्लेम करुन इन्शुरन्स कंपनीची फसवणुक
डॉक्टरसह तीन कर्मचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
राजू परुळेकर
19 ऑगस्ट 2025
मुंबई, – पत्नीला डेंग्यू फिवर झाल्याचे सांगून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आलेले बोगस हेल्थ पॉलिसी क्लेमचे दस्तावेज सादर करुन एका खाजगी इन्शुरन्स कंपनीकडून सुमारे एक लाख रुपयांचा क्लेमच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरसह त्यांच्या दोन सहकारी कर्मचार्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून क्लेमच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. रविंद्रकुमार नरेंद्रबहादूर पांडे, सचिन अरविंद पांडे आणि निरज यादव अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी तक्रारदार पॉलिसीधारकासह इन्शुरन्स कंपनीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदार पॉलिसीधारकाला अलीकडेच हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी संबंधित दोषी डॉक्टरसह कर्मचार्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
संदीपकुमार राजेंद्रप्रसाद राजभर हे कांदिवलीतील पोईसर, गावदेवी रोड, गंगुबाई चाळीत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्याकडे एका खाजगी कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. 24 जूनला त्यांची पत्नी बेबी संदीपकुमार राजभर हिला डेंग्यू फिव्हर झाला होता. त्यामुळे तिला बोरिवलीतील एस. व्ही रोडवर असलेल्या संघवी मॅटर्निटी अॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर 24 जून ते 30 जून या कालावधीत उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर संदीपकुमार राजभर यांच्या वतीने संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे क्लेमसाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जासोबत त्यांच्या पत्नीवर झालेल्या औषधोपचाराच्या दस्तावेजासह बिल सादर करुन 1 लाख 32 हजार 176 रुपयांचे क्लेम करण्यात आला होता. या क्लेमच्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर संदीपकुमार राजभर यांना इन्शुरन्स कंपनीने 1 लाख 5 हजार 331 रुपयांचे क्लेमची रक्कम मंजुर झाली होती.
हा प्रकार अलीकडेच संदीपकुमार राजभर यांच्या निदर्शनास आला होता. त्यांच्या पत्नी डेंग्यू झाला नव्हता. तरीही त्यांच्या पत्नीला संघवी हॉस्पिटलमध्ये 24 जून ते 30 जून अॅडमिट असल्याचे दाखवून तिथे तिच्यावर उपचार करण्यात आल्याचे बोगस दस्तावेज बनविण्यात आले होते. या बोगस दस्तावेजाच्या मदतीने इन्शुरन्स कंपनीकडे क्लेमसाठी अर्ज करुन एक लाख पाच हजार रुपयांचे क्लेम मंजुर करण्यात आले होते. तपासात आलेल्या या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या संपूर्ण कटात संघवी हॉस्पिटलचे डॉ. रविंद्रकुमार पांडे व त्याचे सहकारी कर्मचारी सचिन पांडे आणि निरज यादव यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते.
या तिघांनी संगनमत करुन संदीपकुमार राजभर यांच्या वतीने इन्शुरन्स कंपनीकडे क्लेमसाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीवर उपचार केलेले बोगस दस्तावेज सादर केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांकडे संबंधित डॉक्टरसह इतर दोन कर्मचार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत बोगस दस्तावेज बनवून इन्शुरन्स कंपनीसह पॉलिसीधारकाची फसवणुक केल्याप्रकरणी डॉ. रविंद्रकुमार पांडे, त्याचे दोन सहकारी कर्मचारी सचिन पांडे आणि निरज यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिन्ही आरोपींची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.