रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तिघांची 54 लाखांची फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड पिता-पूत्राला अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
27 डिसेंबर 2025
मुंबई, – रेल्वेत विविध पदासाठी नोकरी भरती सुरु असून तिकिट तपासणी आणि अकाऊंट विभागात नोकरीच्या आमिषाने दोन तरुणीसह तिघांची सुमारे 54 लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपी पिता-पूत्राला अखेर एमएचबी पोलिसांनी अटक केली. अविनाश सत्यनारायण पांडे (37) आणि सत्यनारायण रामचंद्र पांडे (66) अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. या पिता-पूत्राने रेल्वेत नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सन्नी प्रकाश मोहिते हा तरुण दहिसर येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो बी कॉम झाला असून सध्या बेरोजगार आहे. नोकरी नसल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्याच्याच सोसायटीध्ये मानस जितेंद्र शाह असून तो विकासक म्हणून काम करतो. मुंबई शहरात त्याचे विविध ठिकाणी बांधकाम साईट सुरु आहे. जून 2023 रोजी त्याच्या चेंबूर येथील बांधकाम साईटवर असताना त्याने त्याची ओळख त्याचा मित्र अविनाश पांडेशी करुन दिली होती. या ओळखीत अविनाशने त्याचे वडिल सत्यनारायण हे रेल्वेतून निवृत्त झाले असून त्यांची रेल्वेतील काही अधिकार्‍यांसह युनियनच्या पदाधिकार्‍यांशी चांगली आहे. रेल्वेत भरती होणार असून त्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते.

तिकिट तपासणीस आणि अकाऊंट विभागात मोठी भरती असून त्याच्यासह इतर 30 ते 40 लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा विश्वास बसावा म्हणून अविनाशने त्याच्या मोबाईलवर ज्या तरुणांना रेल्वेत नोकरी लावली आहेत, त्यांचे नियुक्तीपत्र, मेडीकल पेपर आणि इतर दस्तावेज दाखविले होते. त्यामुळे त्याचा अविनाशवर विश्वास बसला होता. त्यामुळे त्याने त्याच्यासह त्याची चुलत बहिणी तेजल भागुराम मोहिते आणि सोनल भागुराम मोहिते यांच्यासाठी रेल्वेत नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

चार दिवसांनी अविनाश हा त्याचे वडिल सत्यनारायण पांडे याच्यासोबत त्याच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी नोकरीसाठी प्रत्येक उमेदवारामागे अठरा लाख रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले. सरकारी नोकरी मिळत असल्याने सन्नीच्या वडिलांसह काकांनी त्याला पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना टप्याटप्याने ऑगस्ट 2023 ते 24 मार्च 2024 या कालावधीत 54 लाख 87 हजार 100 रुपये दिले होते. त्यापैकी 19 लाख 78 हजार 500 बँक ट्रान्स्फर तर 35 लाख 8 हजार 600 रुपये रोख स्वरुपात देण्यात आले होते.

मात्र दिड वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना नोकरी मिळवून दिली नाही किंवा नोकरीचे नियुक्तीपत्र दिले नव्हते. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही पिता-पूत्र त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी नोकरीचा विषय सोडून दिला आणि त्यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. या पिता-पूत्राकडून फसवणुक झाल्याचे लक्षात सन्नी मोहिते याने एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अविनाश पांडे आणि सत्यनारायण पांडे या दोघांविरुद्ध पोलिसांनी नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तिघांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड महिन्यांपासून फरार असललेया अविनाश पांडे आणि सत्यनारायण पांडे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या पिता-पूत्राने अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरीच्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page