२०५ कर्मचार्यांच्या पगाराची बोगस नोंद करुन पाच कोटीचा अपहार
दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक दुप्पट रक्कमेच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक केल्याची कबुली
अरुण सावरटकर
२२ मार्च २०२४
मुंबई, – कोरोना काळात वर्क फ्रॉर्म होम सुरु असल्याचा गैरफायदा घेऊन साकिनाका येथील एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याने २०५ कर्मचार्यांच्या पगाराची बोगस नोंद करुन सुमारे पाच कोटीचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी बोगस दस्तावेज बनवून कंपनीची आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मनोज भाऊराव लोखंडे या मुख्य आरोपी अधिकार्याला दहा महिन्यानंतर अटक करण्यात साकिनाका पोलिसांना यश आले आहे. दुप्पट रक्कमेच्या आमिषाने त्याने अपहार केलेली सर्व रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक केली, मात्र शेअरमध्ये नुकसान झाल्यानंतर मनोज हा पळून गेला होता. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
पर्टवीन पॅट्रीक जोसेफ हे त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील हिल रोड, संतोषनगरात राहतात. साकिनाका येथील क्लिनिकल वर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ते बारा वर्षांपासून एचआर संचालक म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनीत पेशंटचे ई-मेडीकल हेल्थ रेकॉर्डचे सॉफ्टवेअर बनविण्याचे तसेच सेवा देण्याचे काम करते. कंपनीचे मुख्यालय युएसएएमघ्ये आहे तर गुजरातच्या अहमदाबाद आणि साकिनाका येथील चांदीवली फर्म रोड, बुमरंग इमारतीच्या सातव्या मजल्यावर कंपनीचे दोन शाखा आहे. मुंबईतील शाखेत २१०० हून अधिक कर्मचारी कामाला असून मनोज लोखंडे हा तिथे अकाऊंट विभागात टिम लीडर म्हणून पे रोलवर नोकरीवर होता. तो पे रोड विभागाचा प्रमुख असल्याने त्याच्यावर सर्व कर्मचार्यांच्या वेतनाची एक्सेल सीट तयार करुन कंपनीच्या बँक खात्यात कर्मचार्यांच्या माहितीसह पगाराची रक्कम अपलोड करणे, कर्मचार्याचे वेतन काढणे आदी कामाची जबाबदारी होती. मार्च २०२० रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कंपनीचे कामकाज वर्क फ्रॉर्म सुरु झाले होते. सर्व कर्मचार्यांच्या कामाची माहिती घेतल्यानंतर त्याद्वारे सर्वांचा पगार काढला जात होता.
ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मनोजने कंपनीच्या २०५ हून अधिक कर्मचार्यांच्या पगाराची बोगस नोंद केली होती. कर्मचार्यांच्या पगाराची रक्कम संबंधित कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा न करता त्याने स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. अशा प्रकारे त्याने १९ महिन्यांत विविध कर्मचार्यांच्या बँक खात्यात त्यांचा पगार जमा केल्याची बोगस नोंद करुन कंपनीच्या सुमारे पाच कोटीचा अपहार केला होता. कंपनीच्या ऑडिटमध्ये हा प्रकार उघडकीस येताच अकाऊंटस ऍण्ड फायानान्स मॅनेजर सुशीलकुमार मनोहरलाल जैन आणि पे रोड टिम लीडर केवलकुमार तिवारी यांनी मनोजकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने कंपनीच्या कर्मचार्यांच्या बोगस नोंद करुन त्यांचा पगार त्याच्या बँक खात्यात जमा न करता स्वतच्या बँकेत खात्यात जमा करुन कंपनीची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याची कबुली दिली होती. या रक्कमेची आपण परतफेड करु शकत नाही असे सांगून कंपनीची माफी मागितली होती. हा प्रकार कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना समजताच त्यांनी पर्टवीन जोसेफ यांना मनोज लोखंडेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी कंपनीच्या वतीने साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मनोजविरुद्घ पोलिसांनी ४०८, ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच मनोज हा पळून गेला होता. गेल्या दहा महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र तो सतत पोलिसांना गुुंगारा देत होता. ही शोधमोहीम सुरु असताना मनोजला गुरुवारी नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. तपासात मनोज हा नवी मुंबईतील उलवे, सेक्टर क्रमांक नऊ, महावीर मन्नत अपार्टमेंटच्या बी ५०६ मध्ये राहत होता. कंपनीत सुमारे पाच कोटीचा अपहार केल्यानंतर त्याने शेअरमध्ये काही पैशांची गुंतवणुक केली होती. शेअरमध्ये गुंतवणुक केल्यानंतर त्याला दुप्पट रक्कम मिळतील असे वाटत होते. मात्र त्याला तिथे प्रचंड नुकसान झाले होते. गुंतवणुक केलेली रक्कम बुडाल्याने तो प्रचंड घाबरला होता. कंपनीतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पळून गेला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो विविध ठिकाणी वास्तव्यास होता. मात्र त्याला दहा महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.