एमएमआरडीएमध्ये घराचे स्वप्न दाखवून अडीच कोटीची फसवणुक
कटातील मुख्य आरोपीच्या सहकार्याच्या साडेतीन वर्षांनी अटक व कोठडी
अरुण सावरटकर
29 जानेवारी 2026
मुंबई, – साई यश इंटरप्रायजेस नावाची बोगस फर्मची स्थापना स्थापना करुन अंधेरीतील चकाला, कनकिया परिसरात स्वस्तात घराचे स्वप्न दाखवून अनेक गोरगरीब लोकांची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणुक कटातील मुख्य आरोपीच्या जवळच्या सहकार्याला अखेर साडेतीन वर्षांनी अटक करण्यात वनराई पोलिसांना यश आले आहे. धनबहादूर मानसिंग खडका ऊर्फ गोरखा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत राष्ट्रवादी, आरपीआयसह एमएमआरडीएच्या कथित अधिकार्यांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन संबंधित लोकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले होते. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पळून गेले होते. त्यात धनबहादूर खडका याचाही समावेश होता. अखेर साडेतीन वर्षांनी त्याला या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.
चेतन कृष्णा जायगडे हे मालाड येथे राहत असून त्यांचा ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. ऑक्टोंबर 2019 रोजी त्यांची सुभाष पाटील या निवृत्त पोलीस अधिकार्यामार्फत नवीनसिंग गोरखा याच्याशी ओळख झाली होती. नवीनसिंग हा राष्ट्रवादीचा तालुका उपाध्यक्ष होता. त्याने साई यश इंटरप्रायजेस नावाची एक फर्म तयार करुन त्याद्वारे गरीबांसाठी अंधेरीतील कानकिया, चकाला परिसरात अवघ्या बारा लाखांमध्ये घरांची एक स्किम सुरु केली होती. या घरांची त्याने जाहिरात केल्याने त्याला अनेकांनी संपर्क साधला होता. या योजनेत त्याला रवी सरदवदे (कांदिवली तालुका अध्यक्ष-आरपीआय), मोहसन अत्तार, राजेश घागडे (राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष), नदीम, सचिन यादव (राष्ट्रवादी सरचिटणीस), धनसिंग गोरखा, मासुम नवीनसिंग गोरखा, श्वेता सिंग ऊर्फ श्वेता नवीनसिंग गोरखा यांनी मदत करताना अनेकांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. नवीनसिंग गोरखा याला सतीश यादव, अजय बारी आणि केशव पांडे (एमएमआरडीए अधिकारी) हे घराच्या कागदपत्रांच्या जुळवाजुळवासाठी मदत करत होते.
इच्छुकांनी घरासाठी आधी चार लाख रुपयांचा धनादेश आणि पाच लाख रुपये कॅश स्वरुपात द्यावे. घराचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावे लागेल असे सांगण्यात आले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी या योजनेत घर बुक केले होते. ठरल्याप्रमाणे कॅश आणि धनादेश स्वरुपात अनेकांनी नवीनसिंगकडे सुमारे अडीच कोटी रुपये जमा केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी घराचा ताबा दिला नाही. प्रशासकीय कामासह लॉकडाऊनचे गाजर दाखवून ते सर्वांना टाळत होते. काही महिन्यांनी त्यांनी स्किममधील सभासदांना विविध शासकीय दस्तावेज दिले होते. या दस्तावेजची शहानिशा केल्यानंतर ते सर्व बोगस असल्याचे काही सभासदांच्या निदर्शनास आले होते. या प्रकाराने अनेकांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी नवीनसिंगसोबत एक मिटींग आयोजित केली होती. या मिटींगमध्ये नवीनसिंगसह इतर आरोपींनी केवळ फसवणुकीच्या उद्देशाने ही स्किम सुरु करण्यात आली होती.
अशा प्रकारची कोणतीही योजना नसून ऐशोआरामासाठी ही रक्कम घेऊन त्यांना खोटी आश्वासने देण्यात आल्याची कबुली दिली. तसेच या सर्वांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र कोणालाही पैसे परत केले नाही. घराच्या स्किमच्या नावाने नवीनसिंगसह इतरांनी आतापर्यंत अनेकांकडून अडीच कोटी रुपये घेतले आहे. मात्र कोणालाही घर दिले नाही किंवा घरासाठी घेतलेले पैसे परत केले नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे चेतन जायगडे यांनी 12 जुलै 2022 रोजी नवीनसिंगसह इतर आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर तीन महिन्यानंतर म्हणजे गुरुवारी 6 ऑक्टोंबरला संबंधित सर्व आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या गुन्ह्यांत काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र गुन्हा घडल्यानंतर धनबहादूर खडका ऊर्फ गोरखा हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या साडेतीन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या धनबहादूरला बुधवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.