फ्लॅटसाठी घेतलेल्या 1.81 कोटीचा अपहार करुन फसवणुक

अडीच वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक

0

अरुण सावरटकर
12 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅटसह रजिस्ट्रेशनसाठी घेतलेल्या 1 कोटी 81 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका मुख्य आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. चेतन भिकालाल त्रिवेदी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याची पत्नी किशोरी चेतन त्रिवेदी ही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुलै 2022 रोजी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी पती-पत्नी पळून गेले होते. अखेर अडीच वर्षांनी आरोपी पतीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अमृतलाल दर्शन सिंग हे शासकीय कंत्राटदार असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, गार्डनिया अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी ते फ्लॅटचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांची चेतन व त्याची पत्नी किशोरी त्रिवेदी यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्या मालकीचा कांदिवलीतील एम. जी रोड, काला हनुमान मंदिराजवळील मधुवन सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर एक फ्लॅट होता. या फ्लॅटची त्यांना विक्री करायची होती. त्यामुळे त्यांनी मधुवन सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील 705 क्रमांकाच्या फ्लॅटची पाहणी केली होती. हा फ्लॅट आवडल्याने त्यांनी तो फ्लॅट खरेदीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेतनने त्यांना पवईतील फुलेरटोन इंडिया क्रेडिट कंपनीतून गृहकर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी गृहकर्जासाठी अर्ज केला होता.

या अर्जानंतर त्यांना कंपनीकडून 1 कोटी 66 लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर झाले होते. या कर्जाचा धनादेश कंपनीने त्यांच्याकडे न देता परस्पर चेतन त्रिवेदीला दिला होता. इतकेच नव्हे तर चेतनने फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांच्याकडून पंधरा लाख वीस हजार रुपये घेतले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनविले होते. मार्च 2017 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत फ्लॅटसाठी 1 कोटी 81 लाख 20 हजार रुपये घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे कॉल घेतले नाही. नंतर त्यांनी त्यांचे कॉल बंद केले होते.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच अमृतलाल सिंग यांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात चेतन व त्याची किशोरी त्रिवेदी यांच्याविरुद्ध एक याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर जुलै 2022 रोजी बोरिवली कोर्टात अंतिम सुनावणी झाली होती.

यावेळी कोर्टाने कांदिवली पोलिसांना चेतन त्रिवेदी आणि किशोरी त्रिवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अमृतलाल सिंग यांची कांदिवली पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी 406, 420, 474, 468, 465, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र गुन्हा दाखल होताच त्रिवेदी पती-पत्नी पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या अडीच वर्षांपासून फरार असलेल्या चेतन त्रिवेदीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पत्नी किशोरी त्रिवेदी हिला पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page