फ्लॅटसाठी घेतलेल्या 45 लाखांचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक
कर्जाची माहिती न देता फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला
अरुण सावरटकर
28 डिसेंबर 2025
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या 45 लाखांचा अपहार करुन एअर इंडियामधून निवृत्त झालेल्या एका 59 वर्षांच्या व्यक्तीची फसवणुक केल्याप्रकरणी प्रदीप मनोहरलाल शहा या आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत प्रदीपची पत्नी निलम प्रदीप शहा ही सहआरोपी असून या दोघांनी फ्लॅटवर असलेल्या 90 लाखांच्या कर्जाची माहिती न देता फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. दरम्यान फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत प्रदीपला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज गजानन जाधव हे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स, वसंत स्मृती इमारतीच्या फ्लॅट क्रमोंक 102 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते एअर इंडियामध्ये कामाला होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्याच सोसायटीमधील ई/501 मध्ये प्रदीप शहा हा त्याच्या कुटुंबिय राहत असून ते एकमेकांच्या वीस वर्षांपासून परिचित आहेत. त्यांच्या सोसायटीचा एक ग्रुप असून याच ग्रुपमध्ये प्रदीपने त्याचा फ्लॅट विक्रीबाबत माहिती शेअर केली होती. राज जाधव यांनी फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची असल्याने त्यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत प्रदीपने त्यांना फ्लॅटची विक्री करत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी त्याला त्याचा फ्लॅट खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.
ठरल्याप्रमाणे राज जाधव यांनी प्रदीप आणि त्याची पत्नी निलम यांना टप्याटप्याने 45 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर ते दोघेही एका वकिलाकडे गेले होते. तिथेच त्यांनी सेल डिड आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे दस्तावेज बनविले होते. याच दरम्यान त्यांना प्रदीपने त्यांच्या फ्लॅटवर एका खाजगी कंपनीकडून 90 लाख रुपयांचे मॉर्गेज लोन घेतल्याची माहिती समजली होती. याबाबत त्याने प्रदीपला माहिती दिली असता त्याने मॉर्गेज लोन घेतल्याची कबुली दिली. ही माहिती त्याने त्यांच्यापासून लपवून ठेवली होती, त्यामुळे त्यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द केला होता. तसेच फ्लॅटसाठी दिलेले 45 लाखांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे त्याने त्यांना तीन वेगवेगळे धनादेश दिले, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
त्यांनी त्याला वकिलाकडून लिगल नोटीस पाठविली होती. मात्र या नोटीसला त्याने उत्तर दिले नाही. फ्लॅटसाठी घेतलेले 45 लाख रुपये प्रदीपकडून मिळत नसल्याची खात्री होताच त्यांनी त्याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या प्रदीप शहा दोन वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.