फ्लॅटच्या आमिषाने तीन व्यक्तींची सव्वाकोटीची फसवणुक

सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक

0

अरुण सावरटकर
1 जानेवारी 2026
मुंबई, – जोगेश्वरी, गोरेगाव, माहीम आणि वांद्रे परिसरात आठ फ्लॅटसाठी तीन व्यक्तींची सुमारे सव्वाकोटीच्या फसवणुक कटातील जितेंद्र सुखलाल राठोड नावाच्या एका 53 वर्षांच्या एका मुख्य आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. यापूर्वी याच गुन्ह्यांत बेला मेलवीन डिसुजा या म्हाडाच्या तोतया महिला अधिकार्‍याला पोलिसांनी अटक केली होती. म्हाडा आाणि एसआरएमध्ये फ्लॅटच्या आमिषाने फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत केदार साटम आणि गिरीश राव हे सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर जितेंद्र राठोडला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोहित सोहनलाल चांदगोटिया हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या गोविंदनगर परिसरात राहतात. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी कॉटन यार्न ट्रेडिंगचा व्यवसाय करते. त्यांच्या परिचित शॅकी सुशीलकुमार अग्रवाल यांनी केदार साटमच्या मदतीने ओशिवरा येथील व्हिंडसर ग्रँड या निर्माणधीन इमारतीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. त्याने त्यांची बेला डिसुजाशी ओळख करुन दिली होती. बेला हीम्हाडामध्ये काम करत असून तिच्या मदतीने तो अनेकांना स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो असे सांगितले होते. रोहित चांदगोटिया हे स्वतसाठी एका नवीन फ्लॅटच्या शोधात होते, त्यामुळे त्यांनी केदार आणि बेला यांच्याकडे त्यांच्यासाठी फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती.

यावेळी या दोघांनी त्यांना गोरेगाव येथील दादर येथील सुगी सदनमध्ये ऐंशी लाखांमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या फ्लॅटचे लोकेशन चांगल्या ठिकाणी असल्याने त्यांनी तिथे फ्लॅट घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी रोहित चांदगोटिया यांनी त्यांना 72 लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. ही रक्कम जितेंद्र राठोडला देण्यात आली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना फ्लॅटची बुकींग पावती दिली होती, मात्र फ्लॅट दाखविण्याची विनंती करुनही फ्लॅट दाखविला नव्हता.

याच दरम्यान या टोळीने शॅकी अग्रवाल यांच्याकडे कामाला असलेल्या रामकेवल धर्मराज यादव यांना गोरेगाव येथे एसआरएचा फ्लॅटचे आमिष दाखविले होते. एसआरएच्या याच फ्लॅटसाठी त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले होते. काही दिवसांनी बेलाने शॅकी अग्रवाल यांना वांद्रे आणि माहीम येथे फ्लॅटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. फ्लॅटमध्ये केलेल्या या गुंतणुकीवरत्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगितले होते. इतकेच नव्हे तर त्यांना सहा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून बुकींग आणि स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले होते.

अशा प्रकारे 1 मार्च 2022 ते 30 मार्च 2025 या कालावधीत बेला डिसुजा, केदार साटम, जितेंद्र राठोड आणि गिरीश राव या चौकडीने रोहित चांदगोटिया यांना दादर येथील फ्लॅटसाठी 72 लाख, रामकेवल यादव यांच्याकडून गोरेगाव येथील एसआरए फ्लॅटसाठी 25 लाख, शॅकी अग्रवाल यांच्याकडून गोरेगाव येथील म्हाडा, माहीम व वांद्रे येथील सहा फ्लॅटच्या बुकींग आणि स्टॅम्प ड्युटीसाठी 25 लाख असे 1 कोटी 22 लाख रुपये दिले होते. मात्र तीन वर्षांत कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. विचारणा केल्यानंतर ते चौघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद करुन पलायन केले होते.

फ्लॅटच्या आमिषाने या चौघांनी तिघांची सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांतर बेला डिसुजा, केदार साटम, जितेंद्र राठोड आणि गिरीश राव या चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते सर्वजण पळून गेले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमाहीम सुरु असताना जून 2025 रोजीला बेला डिसुजा हिला पोलिसांनी अटक केली.

तिच्या चौकशीत तिने जितेंद्र राठोडच्या सांगण्यावरुन संबंधित फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तसेच तो या कटातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमेहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या जितेंद्र राठोडला दोन दिवसांपूर्वी अटक केली.

तपासात फ्लॅटच्या आमिषाने गंडा घालणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने मुंबई शहरात अनेकांना म्हाडा, एसआरए आणि एमएमआरडीएसह खाजगी निर्माणधीन इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा घातला आहे. जितेंद्रला यापूर्वी पोलिसांनी समतानगर पोलिसांनी अशाच एका फसवणुकीचा गुन्ह्यांत अटक केली होती. आता त्याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page