३.६८ कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
राजू परुळेकर
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन देऊन ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजयसिंह किसनसिंह राव या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह याचा काळबादेवी येथे श्री गुरुकृपा ज्वेल्स नावाचे ज्वेलर्स दुकान असून त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राकेश संपतलाल ढिलीवाल हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची मालाड परिसरात क्लासिक कास्ट नावाची एक कंपनी असून कंपनीतर्फे सोन्याचे दागिने बनवून ते होलसेलमध्ये विविध व्यापार्यांना विक्री केले जाते. त्यांच्याकडे शैलेंद्र सिंग हा मॅनेजर म्हणून काम करत असून त्याच्यावर कंपनीची सर्व जबाबदार आहे. कामात हुशार असल्याने त्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. गेल्या वर्षी त्याने त्यांची ओळख नवी मुंबईतील कौपरखैरणेचा रहिवाशी असलेल्या विजयसिंहशी करुन दिली होती. त्याने त्याचे काळबादेवी येथे श्री गुरुकृपा ज्वेल्स नावाचे एक ज्वेलर्स दुकान असल्याचे सांगितले होते. त्याने त्यांच्याशी व्यवहार सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शैलेंद्र सिंगने त्याची शिफारस केली होती, त्यामुळे ते त्याला विविध सोन्याचे दागिने देणार आणि तो त्यांना दागिन्यांच्या मोबदल्यात सोन्याचे बिस्कीट देणार असल्याचे मान्य केले होते. मे २०२४ रोजी विजयसिंह हा त्यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने त्यांच्याकडे २२ कॅरेटचे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करुन त्यामोबदल्यात त्यांना २४ कॅरेट सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला २४ मेला २२ कॅरेटचे २६७३ ग्रॅम, २६ जूनला ६७८ ग्रॅम आणि २५ जून २०२४ रोजी १४९७ ग्रॅम वजनाचे विविध कानातील टॉप्स, लेडीज ब्रेसलेट, अंगठी, मंगळसूत्र असे ३ कोटी ६८ लाख १५ हजार ३८० रुपयांचे ४ किलो ८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले होते. ठरल्याप्रमाणे दहा ते पंधरा दिवसांत त्याने त्यांना २४ कॅरेटचे सोन्याचे बिस्कीट देण्याचे मान्य केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोन्याचे बिस्कीट दिले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो पाऊस सुरु आहे, सध्या मार्केटमध्ये मंदी आहे, पैशांची अडचण आहे असे विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
याबाबतची माहिती मिळताच त्याने त्यांना कॉल करुन त्याच्याविरुद्ध तक्रार करु नका. लवकरात लवकर सोने किंवा सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगितले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांची तक्रार मागे घेतली होती. मात्र एक ते दिड महिना उलटूनही त्याने त्याचा शब्द पाळला नाही. त्यामुळे ते काळबादेवीतील विठ्ठलवाडी परिसरातील त्याच्या दुकानात गेले होते, मात्र तो त्यांना सापडला नाही. कॉल केल्यानंतर त्याने त्यांना सुरती हॉटेलजवळ बोलाविले. त्यामुळे ते तिथे गेले. यावेळी विजयसिंहने त्याच्याकडे पैसे नाही किंवा सोने नाही. त्यांच्या दागिन्यांची परस्पर विक्री केली असून तुम्हाला काहीही देणार नाही. तुला जे काय करायचे आहे ते कर, मी कोणालाही घाबरत नाही असे सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली होती.
विजयसिंहकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच राकेश ढिलीवाल यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी विजयसिंह राव याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विजयसिंहने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.