स्वस्तात सोन्याच्या मोहापायी पाच लाख रुपये गमावले
पळून गेलेल्या ठगाला अटक तर साथीदार महिलेचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – स्वस्तात सोने देतो असे सांगून एका व्यक्तीकडील सुमारे पाच लाख रुपयांची कॅश घेऊन पळून गेलेल्या उबेदउल्ला मुद्दसर शेख या ठगाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत एका महिलेचा सहभाग उघडकीस आला असून तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
राजेशकुमार श्यामनंदन भगत हा अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतो. त्याची इन्साफ मिडीया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून त्याचे उदरनिर्वाह चालते. काही दिवसांपूर्वी त्याची सलीम नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तो झारखंडच्या हजारीबागचा रहिवाशी असून पूर्वी दुबईत कामाला होता. त्याच्याकडे दुबईहून आणलेले काही सोने असून पैशांची गरज असल्याने त्याला सोन्याची विक्री करायची आहे. त्यामुळे त्याने त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले होते. त्याचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्याला काही सोने दाखविले होते. बारा तोळे अवघ्या पाच लाखांना देतो असे सांगून त्याने त्याला दहिसर येथील कांदरपाडा परिसरात बोलाविले होते. स्वस्तात सोने मिळत असल्याने राजेशकुमारने पाच लाखांची व्यवस्था केली होती.
ठरल्याप्रमाणे राजेशकुमार कांदरपाडा मेट्रो स्टेशनजवळ गेले होते. यावेळी तिथे गेल्यानंतर सलीमसोबत एक महिला आली होती. त्याने ती त्याची बहिण असल्याचे सांगून त्याच्याकडून पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर ते दोघेही त्याला जोरात धक्का मारुन तेथून पळून गेले होते. त्यानी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते दोघेही मायकलवाडीतील गल्लीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. स्वस्तात सोन्याच्या मोहापायी दोन्ही आरोपी त्यांच्याकडील पाच लाखांची कॅश घेऊन पळून गेले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एमएचबी पोलिसांना सांगून तिथे दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पळून गेलेल्या उबेदउल्ला शेख याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या महिलेचा आता पोलीस शोध घेत आहेत.